सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 19 मार्च 2024 (09:28 IST)

प्रकाश आंबेडकरांना २४ तासांची डेडलाईन : मंगळवार संध्याकाळपर्यंत निरोप द्या

prakash ambedkar
अकोला : लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला तरी महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा काही सुटायला तयार नाही. भाजपकडून महाराष्ट्रातील २० उमेदवारांची यादी जाहीर होऊन बरेच दिवस उलटले तरी मविआच्या जागावाटपाचे गु-हाळ अजूनही सुरुच आहे. यासाठी प्रामुख्याने प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी सोबत येणार की नाही, याबाबत असलेला संभ्रम कारणीभूत ठरत आहे.
 
प्रकाश आंबडेकरांनी मविआसमोर थेट २७ जागांचा प्रस्ताव मांडत खळबळ उडवून दिली होती. त्यामुळे मविआच्या जागावाटपाचे घोडे अडून बसले आहे. प्रकाश आंबेडकर कोणत्याही परिस्थितीत माघार घ्यायला तयार नाहीत. एकीकडे संजय राऊत हे वंचित आमच्यासोबत येईल, असे वारंवार सांगितले तरी प्रकाश आंबेडकर तितक्याच तत्परतेने, अद्याप आमचं काहीच ठरलं नाही, असे सांगत आहेत. या सगळ्यामुळे वंचित पक्ष आपल्यासोबत येण्याच्या मविआच्या नेत्यांच्या आशा जवळपास मावळल्या आहेत. आता फक्त ही संभाव्य युती तुटली, असे जाहीर करुन चर्चा फिस्कटवण्याचा आळ स्वत:वर कोण घेणार, यासाठी बहुधा दोन्ही पक्ष एकमेकांची वाट पाहत असावेत. परंतु, लोकसभेची निवडणूक जवळ येऊन ठेपल्याने आता मविआनेच पहिले पाऊल उचलण्याचे ठरवले आहे. मविआकडून आता प्रकाश आंबेडकर यांना २४ तासांचा अल्टिमेटम देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
महाविकास आघाडीचे नेते मंगळवारी संध्याकाळपर्यंत प्रकाश आंबेडकर यांची वाट पाहणार आहेत. उद्या संध्याकाळी 7 वाजेपर्यंत प्रकाश आंबेडकरांकडून येणा-या निरोपाची वाट पाहिली जाईल. त्यानंतर महाविकास आघाडी स्वतंत्रपणे निर्णय घेण्याची शक्यता आहे.

Edited By -Ratnadeep Ranshoor