गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 22 जुलै 2021 (15:14 IST)

एटीएममध्ये स्फोट घडवून 28 लाख 77 हजारांची रोकड चोरीला

दोन अनोळखी चोरट्यांसह हिताची पेमेंट सर्विसेस आणि त्यांच्या फ्रॅंचाईजी कंपनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खेड तालुक्यातील भांबोली गावात मुख्य रस्त्याच्या बाजूला असलेल्या एटीएममध्ये स्फोट घडवून दोन अनोळखी चोरट्यांनी 28 लाख 77 हजार रुपयांची रोकड चोरून नेली. दरम्यान या चोरट्यांनी एका व्यक्तीला पिस्तुलाचा धाक दाखवला. याप्रकरणी दोन अनोळखी चोरट्यांसह हिताची पेमेंट सर्विसेस आणि त्यांची फ्रॅंचाईजी कंपनी प्रॉपर्टी डेक्सचे सागर दांगट आणि इतर संबंधित यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
ही घटना पहाटे  अडीच ते पहाटे चार वाजताच्या कालावधीत घडली. याबाबत पोलीस नाईक हनुमंत कांबळे यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भांबोली गावात हिताची कंपनीचे एटीएम आहे. बुधवारी मध्यरात्री अडीच वाजता दोन चोरट्यांनी एटीएम मध्ये स्फोटकांच्या सहाय्याने स्फोट घडवला. एटीएम मधून 28 लाख 77 हजार रुपये चोरी केले. यावेळी अनोळखी चोरट्यांना सोमनाथ सोपान पिंजण या व्यक्तीने हटकले. त्यावेळी त्यापैकी एकाने सोमनाथ पिंजन यांच्यावर पिस्टल सारखे  हत्यार रोखले. दुसऱ्या चोरट्याने, इसको गोली मारो असे म्हटले.
 
या प्रकरणात दोन चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच बरोबर हिताची पेमेंट सर्विसेस आणि त्यांची फ्रॅंचाईजी कंपनी प्रॉपर्टी डेक्सचे सागर दांगट व इतर संबंधित यांनी एटीएमच्या सुरक्षिततेच्या उपाययोजनांबाबत पोलिसांनी लेखी आदेश देऊन देखील जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. निष्काळजीपणा करून सरकारी आदेश पाळला नाही. यामुळे ही चोरीची घटना घडली असा ठपका ठेवत पोलिसांनी त्यांच्यावही गुन्हा दाखल केला आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.