नागपूरमध्ये 12 वर्षीय मुलीवर तब्बल 9 जणांचा सामूहिक बलात्कार
नागपूरमध्ये 12 वर्षीय मुलीवर नऊ जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे नागपूर जिल्ह्यातील उमरेडमध्ये हा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी 9 जणांना अटक केली आहे.
नेमकं काय घडलं?
नागपूर ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणाची सविस्तर माहिती दिली आहे. नागपूर ग्रामीणच्या उपविभागीय अधिकारी आणि तपास अधिकारी पूजा गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, "12 वर्षीय पीडितेचे आई-वडिल शेतमजूर आहेत. उमरेडमधील 40 वर्षीय आरोपी गजानन मुरस्कर हा पीडित मुलीच्या घराजवळच राहतो. त्याच्या घरी कुख्यात गुंड रोशन सदाशिव कारगावकर (29) याची नेहमी ये-जा होते. रोशनची वाईट नजर या मुलीवर पडली.
"19 जूनला मुलीचे आई-वडिल गावी गेले होते. दुपारी रोशन कारगावरकर आणि गजानन मुरस्कर हे दोघे मुलीच्या घरी आले. त्यांनी मुलीला उचलून रोशनच्या घरी नेले. तिथे तिच्यावर प्रेमदास जागोबा गाठीबांधे, गोविंदा गुलाब नटे आणि सौरव ऊर्फ करण उत्तम रिठे यांनी बलात्कार केला. यामुळे ती मुलगी बेशुद्ध पडली.
"सायंकाळी ती शुद्धीवर आल्यानंतर रोशनने तिला 300 रुपये दिले आणि याबाबत कुणालाही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. रात्री 11 वाजताच्या सुमारास पुन्हा रोशन तिच्या घरी आला आणि तिला घराच्या स्लँबवर घेऊन गेला. तेथे राकेश शंकर महाकाळकर, नितेश अरूण फुकट आणि प्रदुम्न दिलीप कुरुटकर आणि निखिल ऊर्फ पिंकू निनायक नरुले असे पाच जण दारू पित बसले होते."
गायकवाड यांनी पुढे सांगितलं की, "तिला दमदाटी करून पाचही जणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. पहाटेच्या सुमारास त्या मुलीला रोशनने तिच्या घरी सोडले. तब्बल नऊ जणांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्यामुळे ती मुलगी आजारी पडली.
"15 जुलैला रोशनने गावातील मित्रांसोबत मुलीवर पुन्हा सामूहिक बलात्कार केला. दरम्यान, आरोपी रोशन याने पैशाच्या वादातून 25 जुलै रोजी एकाची हत्या केली. 25 जुलै रोजी घडलेल्या हत्याकांडातील आरोपी रोशन याने पोलीस कोठडीत असताना या गुन्ह्याची कबुली दिली. आणि हे प्रकरण उघडकीस आलं."
या प्रकरणी उमरेड पोलिसांनी सामूहिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करून 9 जणांना अटक केली असून या गुन्ह्यात आणखी आरोपी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.