मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 13 ऑक्टोबर 2023 (08:08 IST)

समुद्रात जेलिफिश उठल्याने मच्छीमारीवर दुहेरी संकट. कोलंबी उत्पादनावर मोठा परिणाम होणार? जाळ्यात गावतोय कचरा- पालापाचोळा

वादळी हवामानामुळे मधल्या काळात मासेमारी ठप्प झाली होती.मुरूड परिसरात सोमवार पासून मासेमारीचा सिझन सुरू झाला. सोमवारी मार्केट मध्ये सोलट,कोलंबी, मुर्या चिंबोरी अशा मासळीची आवक मोठ्या प्रमाणावर झाली असली तरी समुद्रात दाहक जेलिफिश मासळी उठल्याने मासेमारीवर पुन्हा गंडांतर येणार असे दिसून येत असल्याचे मच्चीमारांनी सांगितले.
 
जेलिफिश चा स्पर्श झाला तरी अंगाला खाज सुटते. जेलिफिश मुळे मोठी मासळी किंवा कोलंबी मासळी देखील लांबवर पलायन करीत असते. अशा दुहेरी संकटा मुळे मच्चीमार हतबल झाले आहेत. मंगलवारी सकाळी पदमजलदुर्गा जवळ सुमारे 40 यांत्रिक नौका कोलंबी मासेमारी गेल्या होत्या. परंतु त्यांना समाधानकारक कोलंबी मासळी मिळू शकली नाहो. कोलंबी ऐवजी जाळयात कचरा, पालापाचोळा च आधिक मिळाला.
 
तो साफ करण्यासाठी मेहनत घेऊन जाळी साफ करावी लागत असल्याची माहिती रोहन निशानदार यांनी दिली. एकदरा गावचे नाखवा रोहन निशानदार यांनी मंगळवारी बोलताना सांगितले की, समुद्रात जेलिफिश आल्याने मासेमारीवर मोठा परिणाम होऊन प्रमाण कमी होत आहे.आता कोलंबिचा सिझन असला तरी जेलिफिश कोलंबी मासळीला फस्त करीत असते. पापलेट, सुरमई, रावस सारखी मोठी मासळी दूरवर पलायन करते अशी माहिती रोहन निशानदार यांनी दिली तर राजपुरी गावचे जेष्ठ नाखवा धनंजय गिदी यांनी सांगितले की, येथील नौका सकाळी मासेमारीस गेल्या होत्या परंतु मासळी न मिळाल्या ने राजपुरी बंदरात परतल्या आहेत.
 
जेलिफिश आणि धुक्यामुळे समुद्रातील हवामानात होणार्‍या परिणामामुळे मासळी गायब झाली असून ऐन सिझन मध्ये मच्चीमारांवर नामुष्की सातत्याने ओढवत आहे. सोमवारी मुरूड च्या समुद्रात मुर्‍या नावाचे समुद्री खेकडे जाळ्यात भरपूर मिळाल्याचे एकदरा महादेव कोळी समाजाचे अध्यक्ष आणि मुरूड तालुका मच्चीमार कृती समितीचे अध्यक्ष पांडुरंग आगरकर यांनी बुधवारी बोलताना सांगितले.खाडीकिनारी चिखलात मिळणारे खेकडे आणि समुद्रात मिळणारे मुर्या नावाचे खेकडे यात थोडा फरक आहे. मुर्या खेकडे लाखेने भरलेले चविष्ट असतात. रस्सा चविष्ट होतो. किंमतीही कमी असतात. सोमवारी मार्केट मध्ये मुर्या खेकड्या चे मोठे पीक आल्याचे दिसून आले. परंतु मंगळवारी, बुधवारी कोणतीही मासळी फारशी दिसून आली नाही. जेलिफिश मुळे कोलंबी मिळण्याचे प्रमाण कमी जास्त होताना दिसून येते.