1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 28 नोव्हेंबर 2023 (07:50 IST)

जागा वाटपावरून महायुतीत ठिणगी?

Ajit Pawar
संपूर्ण देशासह राज्यातही लोकसभा निवडणुकांचे वारे वाहत आहे. त्यातच जागावाटपावरून आता महायुतीत नाराजीचे सूर उमटण्याची शक्यता आहे. यावरून शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादीचा अजित पवार गट आमनेसामने येऊ शकतो. कारण महायुतीत भाजपने एकूण 26 जागा लढविणार असल्याचे म्हटले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत संकेत दिले. मात्र, त्यानंतर यू टर्न घेत अद्याप जागा वाटप झाले नसल्याचे सांगितले.
 
दरम्यान, जागावाटपाचा हाच फॉम्यूला राहिला तर शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या वाट्याला प्रत्येकी 11 जागा येऊ शकतात. त्यातच शिंदे गटाकडे असलेल्या मावळ, कोल्हापूर आणि नाशिक या तिन्ही जागांवर अजित पवार गट दावा करणार आहे. यावरून महायुतीत वादाची ठिणगी पडू शकते. मावळ, कोल्हापूर आणि नाशिकमध्ये विद्यमान खासदार शिंदे गटाचेच आहेत. त्यामुळे शिंदे गट कोणत्याही परिस्थितीत या जागा सोडू शकत नाही. मात्र, या तिन्ही मतदारसंघात अजित पवार गटाची शक्ती मोठी आहे. त्यामुळे याच जागांवर अजित पवार गटही दावा ठोकू शकतो. मात्र, शिंदे गट याला कडाडून विरोध करण्याची शक्यता आहे.
 
मुळात अजित पवार गटाकडे एकच विद्यमान लोकसभा खासदार आहे. त्यामुळे त्यांना जागा सोडण्यावरून शिंदे गट कडाडून विरोध करू शकतो. यातूनच महायुतीत वादाचा भडका उडू शकतो. यातूनही समान जागा वाटपाचा मुद्दा पुढे आल्यास शिंदे गटाला दोन ते तीन जागांचा त्याग करावा लागू शकतो. मात्र, शिंदे गट हे कदापि मान्य करू शकणार नाही. कारण येथे शिंदे गटाचे विद्यमान खासदार आहेत.
 
फडणवीसांचा यू टर्न
एकीकडे जागा वाटपावरून महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता व्यक्त केली जात असतानाच फडणवीस यांनी यू टर्न घेत जागावाटपाबद्दल अद्याप काहीही ठरले नसल्याचे सांगितले. या अगोदर महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरल्याचे फडणवीस म्हणाले होते. पण या सर्व चर्चांना देवेंद्र फडणवीसांनीच पूर्णविराम दिला.

Edited by -Ratnadeep Ranshoor