1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 22 ऑक्टोबर 2022 (15:09 IST)

मुंबई पोलिस दलातील सुमारे 40 हजार पोलिसांना प्रवास भाडे मिळणार

mumbai police
मुंबई पोलिस दलातील सुमारे 40 हजार पोलिसांना प्रवास भाडं देण्याचा निर्णय घेतला आहे. पोलिसांचा मोफत बेस्ट प्रवास बंद केल्यानंतर प्रवासभत्ता सुरु करण्याबाबतचा जुना शासन आदेश बदलून राज्य शासनाने भत्ता देण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे पोलिसांना पगारातून 2700 रुपये भत्ता मिळणार आहे. 
 
मुंबई पोलिस दलातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आला आहे. कर्तव्यावर असताना, घरी जाताना किंवा अन्य काही कामासाठी बेस्टच्या बसमधून प्रवास करताना ओळखपत्र दाखवल्यास तिकीट काढण्याची गरज नव्हती. यासाठी पोलिस प्रशासनामार्फत बेस्टला दरवर्षी सुमारे 8 कोटी रुपये भरणा केला जात होता. मात्र 1 जूनपासून मुंबई पोलिसांना मोफत प्रवासाची सुविधा बंद करण्याचा निर्णय तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी घेतला. मोफत प्रवास बंद करण्याचा निर्णय घेताच पोलिसांना पगारात सरसकट प्रतिमहिना 2700 रुपये प्रवास भत्ता देण्याची घोषणा केली आहे. यासाठी मुंबई पोलिसांच्या वतीने राज्य शासनाला पत्रव्यवहारही करण्यात आला आहे. मात्र प्रवासभत्ता सुरु करण्यास मंजुरी देण्यात 1991 मध्ये राज्य शासनाने घेतलेला निर्णय अडसर ठरत होता.
 
या निर्णयानुसार, मुंबईवगळता राज्यातील पोलिसांना प्रवासभत्ता सुरु करण्यात आला, मुंबईत पोलिसांना बेस्टने मोफत प्रवास करण्याची सुविधा याच निर्णयातून देण्यात आली आणि त्यामुळे प्रवास भत्त्याच्या लाभातून मुंबई पोलिसांना वगळण्यात आले आहे. पुन्हा प्रवासभत्ता सुरु करण्यासाठी 1991 चा शासन निर्णय बदलावा किंवा रद्द करावा लागणार होता.
 
या निर्णयानुसार, आता कर्तव्यापासून एक किलोमीटर अंतराच्या आत राहणाऱ्या पोलिसांना हा भत्ता मिळणार नाही. तसेच काही कारणास्तव पोलिस गैरहजर राहिल्यास त्यांनाही या भत्त्यासाठी पात्र धरले जाणार नाही, असे यात नमूद करण्यात आले आहे.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor