मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : शनिवार, 28 सप्टेंबर 2019 (10:27 IST)

अजित पवार राजकीय सन्यास घेणार, मुल शेती करणार, शरद पवार काय म्हणाले ?

काकांवर ईडीने गुन्हा दाखल केला त्यामुळे आपण अस्वस्थ झालो आहोत असं अजित पवार यांनी त्यांच्या मुलांना सांगितलं. इतकंच नाही तर आपण राजकारण सोडून देऊ शेती किंवा व्यवसाय करु असाही सल्ला अजित पवार यांनी त्यांच्या मुलांना दिला. ही माहिती राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
 
शरद पवार यांची पूर्ण परिषद :
पुणे परिसरात खडकवासला व पुरंदर परिसरात अतिवृष्टीमुळे गंभीर पूरस्थिती निर्माण झाली आहे. आज मुंबईतच व्यस्त राहिल्याने अस्वस्थ होतो. परंतु त्यासंबंधी तोडगा निघाल्यानंतर मी लगेच पुण्याकडे निघालो व आज खडकवासला भागातील कोल्हेवाडी परिसराला भेट दिली. मला असं दिसतंय की ज्या ठिकाणी लोकांची घरं वाहून गेलं आहे ती कच्ची घरं होती. त्यांच्या घरातलं सगळं सामान वाहून गेलं आहे आणि ही माणसं पूर्णतः उघड्यावर आलेली आहेत. आज या लोकांना तात्पुरती पर्यायी व्यवस्था केली गेली आहे. तिथे असलेले स्थानिक कार्यकर्ते, स्थानिक सरपंच ते सगळेजण मदत करतायतत. पण ती जी मदत आहे आणि जे सहकार्य आहे ते काही दिवसांपुरतं आणि तात्पुरत्या स्वरूपाचं आहे. कुठे मंदिरात सोय केली कुठे शाळेत सोय केली. तिथे काही जमिनी सरकारच्या आहेत. माझा प्रयत्न हा राहील की राज्य सरकारने केंद्र सरकारची जी हाउसिंगची जी स्कीम आहे त्या अंतर्गत या पूरग्रस्तांना घरं बांधून देऊन त्यांचे पुनर्वसन करावे.
 
मी पुण्याकडे येत असताना माझ्या कानावर बातमी आली की पक्षाचे विधिमंडळ नेते अजित पवार यांनी त्यांच्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या या निर्णयाची मला यत्किंचितही कल्पना नव्हती. कुटुंबप्रमुख म्हणून माझी जबाबदारी आहे की त्यांच्या राजीनाम्याचे कारण जाणून घ्यायचे. मी कुटुंबातील सर्व सदस्यांशी तसेच त्यांच्या चिरंजीवांशी संपर्क साधला.
 
आणि मला असं दिसतंय की आजच त्यांनी आपल्या कुटुंबामध्ये असं सांगितलं की, “मी सहकारी संस्थेमध्ये अतिशय काळजीपूर्वक काम करत असतो. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये किंवा शिखर बँकेमध्ये काही वेळेला काही मोठ्या संस्था, साखर कारखाने असोत किंवा सूत गिरण्या असोत या आर्थिक अडचणी आल्या तर नाबार्ड आणि तत्सम संस्थेची एक नियमावली आहे की या संस्थांना रिव्हॅम्प कसं करायचं. आणि रिव्हॅम्प केलं नाही तर या संस्था संकटात येतात. आणि साहजिकच ज्यांच्यासाठी संस्था आहे तो शेतकरीही संकटात येतो. म्हणून काही निर्णय हे राज्य सहकारी बँकेने घेतलेले आहेत. आणि त्या निर्णयाच्या संबंधीची चौकशी करण्याच्या संबंधीचे आदेश कोर्टातूनही सूचना आलेल्या आहेत. त्या सगळ्या चौकशीसंबंधी मला काही चिंता नाही,” असं त्यांनी आपल्या कुटुंबामध्ये मुलांना सांगितलं. “परंतु एका गोष्टीची मला भयंकर अस्वस्थता आहे, की, काकांचं (म्हणजे माझं) नाव तिथे घेतलं गेलं आणि त्यांच्यावर जो काही गुन्हा दाखल केला.” माझंही नाव तिथे आल्यामुळे ते अस्वस्थ होते. त्यांनी तसं कुटुंबामध्ये बोलून दाखवलं.
 
“महाराष्ट्राच्या संसंदीय संस्थेमध्ये यांनी 51-52 वर्षे काम केलं, चार वेळा मुख्यमंत्री म्हणून राज्याचं नेतृत्व केलं. केंद्र पातळीवर काम केलं. संरक्षण व शेती विभागामध्ये. आणि विविध क्षेत्रामध्ये ज्यांचा नावलौकिक महाराष्ट्रामध्ये आहे त्यांना आमच्या सहकारी बँकेच्या कारभारामुळे ते या सहकारी संस्थेमध्ये सभासदही नसताना त्यांच्या संबंधात सुद्धा चौकशीच्या संबंधात शुक्लकाष्ठ आज या ठिकाणी लागलेलं आहे. हे मला काही सहन होत नाही.”
आणि त्यांनी आपल्या मुलाला सांगितलं की अलिकडे राजकारणाची पातळी अतिशय घसरलेली आहे. आणि त्यांनी आपल्या मुलालाही सल्ला दिला की आपण यातनं बाहेर पडलेलं बरं. त्याच्यापेक्षा आपण शेती किंवा उद्योग करू.
 
अशाप्रकारची चर्चा कुटुंबामध्ये झाल्याचं मला त्यांच्या चिरंजीवांकडून समजलं. या पार्श्वभूमीवर त्यांनी आपला राजीनामा माननीय सभापती, विधानसभा यांच्याकडे पाठवला. त्यांनी अध्यक्षांना हा राजीनामा मंजूर करावा अशी विनंती केली असे समजते. त्याप्रमाणे त्यांनी तो मंजूर केला. राजीनामा देण्याआधी किंवा दिल्याच्या नंतर त्यांनी संपर्क साधलेला नाही. मी त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण माझा काही त्यांच्या संपर्क होऊ शकलेला नाही.
 
त्यांचा स्वभाव कुठलंही काम हातामध्ये घ्यायचं तर धडाडीने पूर्ण करण्याचा आहे. एखादी गोष्ट पटली नाही तर त्यासंबंधी रोखठोक भूमिका घेण्याचा त्यांचा स्वभाव. त्या ठिकाणी माझं नाव आलं त्याबद्दल त्यांच्या मनात अस्वस्थता निर्माण झाली. अशा प्रकारचा एक्स्ट्रीम निर्णय घेण्यामागे हे कारण असावं. मी जरूर यात लक्ष घालणार आहे. कुटुंबप्रमुख म्हणून ती माझी जबाबदारी आहे.