शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 22 ऑक्टोबर 2021 (20:01 IST)

अमरावती : गरिबी आणि महागाईला कंटाळून 12च्या विद्यार्थिनीची आत्महत्या

नितेश राऊत
महागाई आणि गरिबीला कंटाळून 17 वर्षीय अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याची घटना अमरावतीमध्ये घडली आहे. बुधवारी (20 ऑक्टोबर) संध्याकाळी ही घटना घडली आहे.
अमरावती जिल्ह्यातल्या तिवसा तालुक्यातील कुऱ्हा पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या छीदवाडी येथील ही घटना आहे.
सेजल जाधव असं या मुलीचं नाव आहे. तिच्या आत्महत्येनंतर गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मृत्यूपूर्वी सेजलने चिट्ठी लिहून ठेवली होती. त्यात आई, वडिलांवर तिचं ओझे नको म्हणून जीवन संपवत असल्याचं तिनं लिहून ठेवलंय.
सेजलच्या कुटुंबाकडे 3 एकर शेती आहे. तिचे आई, वडील मोलमजुरी करायचे. कर्जाचा डोंगर आणि सततची नापिकीमुळे सेजलच्या कुटुंबाची परिस्थिती हलाखीची होती.
त्यात एक भाऊ, बहीण मिळून 5 जणांच्या कुटुंबाचा गाडा कसा चालेल, याची चिंता तिला सतावत होती. त्यामुळं तिने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलल्याच समोर आलं आहे.
चिठ्ठीत काय लिहिलंय?
आत्महत्येपूर्वी सेजलनं चिठ्ठी लिहून ठेवली आहे. त्यात तिनं लिहिलंय,
"मी सेजल गोपाल जाधव, आत्महत्या करणार. माझ्या घराची परिस्थिती खूप गरीब आहे. माझ्या घरामध्ये आम्ही सहा जण आहोत फक्त माझी आई कामाला जाते. आमच्यावर खूप कर्ज आहे.
"आम्हाला राहण्यासाठी जागा छोटीशी आहे. माझा भाऊ लहान आहे. माझी आई कर्ज काढून आम्हाला शिकवते. माझ्या शेतामध्ये तीन वर्षं उत्पन्न कमी आले आहे. माझे बाबा खूप कष्ट करतात.
"त्यांचा आमच्यावर विश्वास आहे. ते आम्हाला शाळेत पाठवते मी कॉलेजमध्ये आहे. मी इयत्ता बारावीमध्ये आहे. मला शाळेत अॅडमिशन भरण्यासाठी पैसे नाहीत. मी खूप दिवसांपासून डिप्रेशनमध्ये आहे माझी आर्थिक परिस्थिती बिकट आहे. स्वतःहून आत्महत्या करते.
 
"माझे आई-बाबा माझ्यावर प्रेम करते आणि मी माझ्या आई-बाबावर खूप प्रेम करते. मला शाळेमध्ये  कोणत्या विषयाचा समज नाही. आम्हाला शाळेत जाण्यासाठी युनिफॉर्म नाही, आमचं लहान घर आहे. म्हणून मी आत्महत्या करते.
"माझी बहीण कामाला जाते. तिने माझ्यासाठी शाळा सोडली. हीच गोष्ट माझ्या मनात खूप घर करून बसली आहे. माझी आई दररोज कामाला जाते, माझी आई खूप कष्ट करते. माझ्या नाणीची मला खूप आठवण येते लहानपणापासून त्यांच्यापाशी होती. अजून पास नापास होण्याच्या टेन्शन म्हणून मी जीव संपवते."