शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 24 ऑगस्ट 2022 (15:19 IST)

विधिमंडळाच्या पायऱ्यांवर अभूतपूर्व राडा; आमदार एकमेकांना भिडले

राज्य विधिमंडळ अधिवेशनाचा आजचा प्रारंभच अतिशय अभूतपूर्व झाला. विधिमंडळ पायऱ्यांवरच आमदारांमध्ये जोरदार राडा झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी आणि शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांच्यात सर्वप्रथम शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर वाद वाढत गेला आणि थेट आमदार एकमेकांवर धावून गेले. याची गंभीर दखल घेत अन्य आमदार आणि सुरक्षा रक्षकांनी हस्तक्षेप केला. त्यामुळे हा वाद मिटविण्यात यश आले. दरम्यान, याप्रकरणी मिटकरी आणि शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे. तर, या घटनेचे सोशल मिडियात पडसाद उमटत आहेत. राज्यात अनेक प्रश्न असताना आणि खासकरुन शेतकरी प्रचंड अडचणीत असताना त्याप्रश्नी आमदारांमध्ये वाद झाला नाही तर किरकोळ आणि भलत्याच कारणामुळे हा वाद झाल्याने आमदारांवर सोशल मिडियात टीका केली जात आहे.
 
विधिमंडळाचे आजचे कामकाज सुरू होण्यापूर्वीच आमदारांमध्ये जोरदार राडा झाला. आमदार महेश शिंदे यांनी शिवीगाळ केल्याची तक्रार आमदार मिटकरी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. सत्ताधारी आमदारांकडून धमकावले जात असल्याचा आरोपही मिटकरी यांनी केला आहे. यासंदर्भात शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले म्हणाले की, आम्ही कुणाला स्वतःहून भिडत नाहीत. मात्र, आमच्या अंगावर कुणी आलं तर आम्ही शिंगावर घेऊच. आमच्या मार्गात कुणी आलं तर आम्ही सोडणार नाही. आमच्यावर विरोधक विनाकारण आरोप करत आहेत. आता आम्ही भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन केले तर त्यांना एवढे झोंबण्याचे कारण नाही, असे गोगावले म्हणाले.