बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : शुक्रवार, 21 जानेवारी 2022 (08:45 IST)

परमबीर सिंगांच्या जागेवर बी. के. उपाध्याय; पोलीस विभागात मोठे फेरबदल

राज्यातील पोलीस विभागात पुन्हा एकदा मोठे फेरबदल करण्यात आलेत. दोन वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांची आज बदली करण्यात आलीय. वरिष्ठ आयपीएस अधिकारी बी. के. उपाध्याय म्हणजेच डॉ. भूषण कुमार उपाध्याय यांना बढती देण्यात आली  आहे आता विशेष म्हणजे  ते आता गृहरक्षक दलाचे पोलीस महासंचालक असतील. बी. के. उपाध्याय यांची परमबीर सिंगांच्या जागी नियुक्ती करीत त्यांना पोलीस महासंचालकपदी बढती देण्यात आलीय. महाराष्ट्र शासनाचे सहसचिव व्यंकटेश भट यांनी राज्यपालांच्या आदेशानुसार वरिष्ठ आयपीएस अधिकारी बी. के. उपाध्याय यांच्या नियुक्तीचे २० जानेवारीला आदेश काढलेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे परमबीर सिंगांच्या अद्याप कोणतीही बदली मिळालेली नाही.
 
विशेष म्हणजे गेल्या काही महिन्यांपूर्वी परमबीर सिंग यांना महाराष्ट्र होमगार्डचे प्रमुख करण्यात आले होते, पण ते ड्युटीवर हजर झाले नव्हते. प्रकृतीच्या कारणास्तव त्यांनी २९ ऑगस्टपर्यंत रजा घेतली होती, मात्र त्यानंतरही ते कर्तव्यावर परतले नाहीत. दरम्यानच्या काळात त्यांचा पदभार नागरी संरक्षण विभागाचे पोलीस महासंचालक के. वेंकटेशम यांच्याकडे देण्यात आला होता. मार्चमध्ये परमबीर सिंह यांनी राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आपल्या पदाचा गैरवापर आणि भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता. त्यानंतरच त्यांच्या अडचणी वाढल्या होत्या.
 
विशेष म्हणजे महाराष्ट्र सरकारने काही दिवसांपूर्वी आयपीएस अधिकारी परमबीर सिंग यांना निलंबित करून त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई सुरू केली होती. मुख्यमंत्र्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच त्यांनी १२ नोव्हेंबर रोजी परमबीर सिंगांच्या निलंबनाच्या आदेशावर स्वाक्षरी केली होती. यासोबतच ठाणे शहराचे तत्कालीन डीएसपी पराग मणेरे यांनाही निलंबित करण्यात आले होते. आता परमबीर सिंगांच्या जागी बी. के. उपाध्याय यांना पोलीस महासंचालकपदी बढती देण्यात आल्यानं हा चर्चेचा विषय ठरत आहे.