गुरूवार, 14 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 31 ऑगस्ट 2023 (09:54 IST)

महाराष्ट्रात पावसाची मोठी तूट

rain
देशातील काही भागांत सध्या चांगला पाऊस झाला तर काही भागांत अद्यापही पावसाची प्रतीक्षा कायम आहे. दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार १ जूनपासून आतापर्यंत देशात सरासरीच्या ९१ टक्के पाऊस झाला आहे. दरवर्षी ३० ऑगस्टपर्यंत देशात ६८७ मिमी सर्वसाधारणपणे पाऊस होत असतो. यावर्षी मात्र प्रत्यक्षात ६२७ मिमी पावसाची नोंद झाली, अशी माहिती भारतीय हवामान विभागाने दिली. केरळसह महाराष्ट्रात पावसाची मोठी तूट असल्याची माहिती हवामान विभागाने दिली.
 
हवामान विभागाने देशात आतापर्यंत झालेल्या पावसाची माहिती दिली. देशात सरासरीच्या ९ टक्के पाऊस कमी झाला. आतापर्यंत देशात ९१ टक्के पाऊस झाला. यामध्ये केरळमध्ये यावर्षी पावसाची मोठी तूट पाहायला मिळत आहे. जूनपासून केरळात सरासरीच्या ४८ टक्के पावसाची तूट झाली आहे. मध्य महाराष्ट्रात सरासरीच्या २२ टक्के पावसाची तूट झाल्याचे पाहायला मिळत आहे. मराठवाड्यात देखील १ जूनपासून सरासरीच्या १९ टक्के पावसाची तूट झाली आहे, अशी माहिती हवामान खात्याने दिली.
 
संपूर्ण महाराष्ट्रात उणे ५८ टक्के तूट
ऑगस्ट महिन्याचा विचार केला तर राज्यात सरासरीच्या उणे ५८ टक्के तूट निर्माण झाली आहे. कारण ऑगस्ट महिन्यात सरासरीच्या फक्त ४२ टक्के पाऊस झाला आहे.
 
मराठवाड्यात विदारक स्थिती
पावसाने पाठ फिरवल्याने मराठवाड्यात विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण तिथे सरासरीच्या केवळ २८ टक्के पाऊस झाला आहे. त्याखालोखाल मध्य महाराष्ट्र आणि कोकणात केवळ ३६ टक्के पाऊस पडला. राज्यातील १५ जिल्ह्यात पावसाच्या सरासरीतली तूट मोठी आहे. या मोठ्या तुटीमुळे आणि पुढचे काही दिवस पावसाची शक्यता नसल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची भीती वर्तवण्यात येत आहे.