बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 12 जानेवारी 2023 (22:05 IST)

शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपची तयारी सुरु

येत्या ३० जानेवारीला होऊ घातलेल्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपने मतदारसंघनिहाय निवडणूक प्रमुख नेमले आहेत. या प्रमुखांवर पक्षाची निवडणूक यंत्रणा नियोजनबद्ध पद्धतीने राबवून उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी टाकण्यात आली आहे.
 
भारत निवडणूक आयोगाने २९ डिसेंबरला महाराष्ट्र विधान परिषदेच्या औरंगाबाद, नागपूर आणि कोकण शिक्षक तर  नाशिक तसेच अमरावती पदवीधर मतदारसंघासाठी निवडणूक घोषित केली आहे. 
 
सध्या विधान परिषदेच्या २१ जागा रिक्त आहेत. त्यात राज्यपाल नामनियुक्त १२ आणि सोलापूर, अहमदनगर, ठाणे, पुणे, सांगली-सातारा, नांदेड,यवतमाळ, जळगाव, भंडारा- गोंदिया या ९ स्थानिक प्राधिकारी मतदारसंघांचा समावेश आहे. भाजपचे विधान परिषदेत २२ इतके संख्याबळ आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या महाविकास आघाडीच्या तुलनेत भाजपचे संख्याबळ कमी आहे. विधान परिषदेत आघाडीचे २८ सदस्य आहेत. संख्याबळ कमी असल्याने भाजपने  आतापर्यंत विधान परिषदेच्या सभापतिपदाची निवडणूक टाळली आहे.  भाजपला आता  शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत संख्याबळ वाढविण्याची संधी आहे. त्यामुळे भाजपने आपली शक्ती पणाला लावली आहे.