रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 13 फेब्रुवारी 2023 (08:13 IST)

नवे राज्यपाल म्हणून नियुक्त झालेल्या रमेश बैस यांची कारकीर्द

रमेश बैस (Ramesh Bais) हे तब्बल ७ वेळा खासदार म्हणून निवडणून आले असून दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून काम पाहिले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भगतसिंग कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर केला आणि महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून रमेश बैस  यांची निवड करण्यात आली. रमेश बैस हे यापूर्वी झारखंडचे  राज्यपाल म्हणून काम पाहत होते. तर, २०१९ मध्ये त्यांनी त्रिपुराचे  राज्यपाल म्हणूनही काम केले. तसेच, ते तब्बल ७ वेळा खासदार म्हणून निवडणून आले आहेत. त्यांचा जन्म हा २ ऑगस्ट १९४७चा असून १९७८मध्ये ते पहिल्यांदा रायपूर महानगरपालिकेचे नगरसेवक म्हणून निवडून आले होते.
 
त्यानंतर रमेश बैस यांनी १९८२ ते १९८८ या काळात मध्य प्रदेशचे राज्यमंत्री म्हणूनही काम पाहिले. पुढे १९८९मध्ये रमेश बैस हे पहिल्यांदा लोकसभा निवडणुकीत उतरले आणि विजय मिळवत संसदेत प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात अनेक केंद्रीय मंत्रीपदे सांभाळली. त्यानंतर २०१९मध्ये त्यांची निवड ही त्रिपुराचे राज्यपाल म्हणून करण्यात आली.
 
नवे राज्यपाल म्हणून नियुक्त झालेले रमेश बैस हेदेखील अनेकदा चर्चेत आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून रमेश बैस यांचा झारखंड सरकारशी संघर्ष सुरु होता. त्यांनी झारखंड विधानसभेने संमत केलेले ‘झारखंड वित्त विधेयक - २०२२’ २ दिवसांआधीच राज्य सरकारकडे परत पाठवले. तिसऱ्यांदा त्यांनी हे विधेयक परत पाठवल्यामुळे झारखंड सरकार आणि राज्यपाल असा संघर्ष दिसून आला.
 
तसेच, झारखंडमध्ये सुरु असलेल्या राजकीय गोंधळ सुरु असताना राज्याच्या २२व्या स्थापना दिनाच्या सोहळ्यादिवशी राज्यपाल रमेश बैस हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार होते, मात्र ते आलेच नाहीत. झारखंडच्या स्थापना दिनादिवशी राज्यपाल गैरहजर राहणे २२ वर्षांच्या इतिहासात ही पहिलीच वेळ होती. त्यामुळे आणखी एक नवा वाद निर्माण झाला होता. तसेच, त्यांनी, "दिल्लीत फटाक्यांना बंदी आहे, पण झारखंडमध्ये कधीही 'अणू बॉम्ब' फुटू शकतो." असे विधान केले होते. यामुळे झारखंडच्या राजकारणामध्ये मोठी खळबळ उडाली होती. मात्र, राज्यातील सरकार अस्थिर करण्याचा आपला कोणताही हेतू नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते.
Edited by : Ratnadeep Ranshoor