मुख्यमंत्र्यांनी भावनिक निर्णय घ्यायचा नसतो - अजित पवार
गोविंदांना सरकारी नोकरीत आरक्षण देण्याची घोषणा राज्य सरकारने केल्यानंतर त्यावरून वाद सुरू झाला आहे. स्पर्धा परीक्षा देणारे परीक्षार्थी आणि पाच टक्के आरक्षणाचा लाभ मिळणाऱ्या इतर खेळांमधील खेळाडूंनी विरोध केला आहे.
या प्रकरणावरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. मुख्यमंत्र्यांनी भावनिक निर्णय घ्यायचा नसतो, असा सल्ला पवार यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना दिला आहे.
अजित पवार सध्या अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. याठिकाणी माध्यमांशी बोलताना पवार यांनी वरील प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट केली.
"गोविंदा पथकांना आरक्षण देण्याविषयी तुम्ही निर्णय घेतला. पण उद्या त्यांच्यातला एखादा काही न शिकलेला किंवा अगदी दहावीही न झालेला असेल आणि त्यानं त्या पथकात पारितोषिक मिळवलं, तर त्याला तुम्ही कोणती नोकरी देणार? तसंच स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना काय देणार, असा सवाल पवार यांनी केला.