डिसले गुरुजींचा स्कॉलरशिपसाठी परदेशात जाण्याचा मार्ग मोकळा
मुंबई/सोलापूर : ग्लोबल टीचर अवॉर्ड विजेते रणजितसिंह डिसले यांच्या परदेशात स्कॉलरशिपसाठी जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या प्रकरणी राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. वर्षा गायकवाड म्हणाल्या की, माझं सीईओंशी बोलणं झालं आहे, त्यांना स्कॉलरशिपसाठी आवश्यक परवानगी दिली जावी, त्यांना परदेशात पाठवायचं आहे, असं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या.
वर्षा गायकवाड म्हणाल्या की, डिसले सरांसदर्भात मी स्वामींशी बोलले आहे. त्यांना रीतसर परवानगी दिली जाईल. डिसले यांनी प्रोसीजर प्रमाणं अर्ज दिला नव्हता. आता त्यांना प्रक्रियेप्रमाणं कार्यवाही करत परदेशी जाण्याची परवानगी दिली जाणार आहे. डिसले यांना परवानगी देण्यासंदर्भात मी निर्देश दिले आहेत. तसेच डिसलेंवर कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी केली जाईल असंही वर्षा गायकवाड म्हणाल्या.
रणजितसिंह डिसले यांच्याबाबतचा चौकशी अहवाल प्राप्त झालेला असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल अशी माहिती शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार यांनी दिलीय. २०१७ साली रणजितसिंह डिसले यांची जिल्हा शिक्षण प्रशिक्षण केंद्र येथे प्रतिनियुक्तीवर नियुक्ती करण्यात आलेली होती. मात्र या ठिकाणी डिसले गुरुजी हे तीन वर्षे गैरहजर होते. असा अहवाल जिल्हा शिक्षण प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्यांकडून प्राप्त झालेला आहे. त्यामुळे त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल. त्यासंदर्भात प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार यांनी दिली.