सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 23 फेब्रुवारी 2023 (21:30 IST)

ही कृती अत्यंत निषेधार्ह व लोकशाही मूल्ये पायदळी तुडवणारी आहे : पटोले

Nana Patole
काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते पवन खेरा यांना रायपूरला जाण्यापासून रोखत अटक केली, याचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी निषेध व्यक्त करत केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला. "नरेंद्र मोदी सरकारने देशात लोकशाही व संविधान पायदळी तुडवले असून हुकूमशाही कारभार सुरु आहे. काँग्रेसच्या रायपूर येथे होत असलेले महाअधिवेशन सुरुळीत पार पडू द्यायचे नाही असा चंग बांधूनच सरकारी यंत्रणांच्या माध्यमातून नाहक त्रास दिला जात आहे. रायपूरमधील काँग्रेस नेत्यांच्या घरावर ईडीचे छापे मारण्यात आले, त्यात त्यांना काहीच मिळाले नाही.दिल्लीहून काँग्रेसचे अनेक नेते रायपूरला अधिवेशनासाठी जात असताना राष्ट्रीय प्रवक्ते पवन खेरा यांना दिल्ली विमानतळावर विमानातून खाली उतवले, तिथेच काँग्रेस नेत्यांनी विरोध करत घोषणाबाजी केली त्यानंतर आसाम पोलीसांची तक्रार असल्याचे सांगत पवन खेडा यांना अटक केली. मोदी सरकारची ही कृती अत्यंत निषेधार्ह व लोकशाही मूल्ये पायदळी तुडवणारी आहे," असे पटोले म्हणाले.
 
"मोदी सरकारने सर्व मर्यादा पार केल्या असून विरोधी पक्षांना दडपशाहीच्या मार्गाने संपवण्याच्या प्रयत्न केला जात आहे. काँग्रेस पक्ष मोदी सरकारच्या अशा कारवायांना भीक घालत नाही. एकेकाळी जगातील बलाढ्य शक्ती असलेल्या जुलमी ब्रिटिशांना काँग्रेसने देश सोडण्यास भाग पाडले हे मोदी सरकारने लक्षात ठेवावे. मोदी सरकारची कृती हूकूमशाही प्रवृत्तीचीच असून या प्रवृत्तीचा मुकाबला काँग्रेस पक्ष करेल," असेही नाना पटोले.
 
Edited by: Ratnadeep Ranshoor