सीबीआय चौकशीची मागणी, नार्को टेस्ट करावे ; नवाबांवर भाजपचा पलटवार
मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात रोज नवे ट्विस्ट येत आहेत. कधी महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक आरोपांच्या फैरी झाडतात तर कधी विरोधी पक्ष. आता भाजप नेते आणि आमदार राम कदम यांनी सत्ताधाऱ्यांचे कारभार उघडकीस आल्यानंतर नवाब मलिक बॅकफूटवर आल्याचे म्हटले आहे.
ते म्हणाले, 'ड्रग पार्टी प्रकरणी मलिक सातत्याने पत्रकार परिषदेत भाजपवर हल्लाबोल करत होते. आता आपली कोणत्याही पक्षाविरोधात तक्रार नसल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रवादीचे सुनील पाटील यांच्याशी असलेले संबंध उघड झाल्यानंतर सत्ताधारी पक्ष बॅकफूटवर आहेत. तर, शाहरुख खानपासून ते किरण गोसावीपर्यंत पैसे उकळण्यातही सत्ताधारी सहभागी होते. हे खंडणी रॅकेट सत्ताधारी पक्षाचे नेते चालवत होते आणि ते होते 'वाझे वसुली गेट' भाग-2. आता राज्य सरकारनेच या प्रकरणाची सीबीआय चौकशी करून किरण गोसावी व इतरांची नार्को टेस्ट करावी, अशी मागणी केली.
याआधी महाराष्ट्रातील भाजप नेते मोहित कंबोज यांनी क्रूझ ड्रग्ज प्रकरणी अनेक दावे केले होते. या संपूर्ण प्रकरणाचा सूत्रधार सुनील पाटील राष्ट्रवादीशी संबंधित असल्याचे मोहित कंबोज यांनी सांगितले होते. महाराष्ट्र सरकारमधील एक मंत्री संपूर्ण सिंडिकेट चालवत असल्याचा आरोपही कंबोज यांनी केला होता. नवाब मलिक यांनी मोहित कंबोजवरही आरोप केले होते. सुनील पाटील हा अनिल देशमुख यांचा मुलगा हृषीकेश देशमुख याचा मित्र असल्याचा आरोप कंबोज यांनी केला.
रविवारी महाराष्ट्र सरकारचे मंत्री नवाब मलिक यांनी आणखी एक पत्रकार परिषद घेऊन याप्रकरणी अनेक आरोप केले. भारतीय जनता युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष मोहित कंबोज हा खंडणी प्रकरणाचा सूत्रधार असून समीर वानखेडे त्याचा साथीदार असल्याचा दावा त्यांनी केला. एवढेच नाही तर नवाब मलिक यांनी सुनील पाटील आणि राष्ट्रवादी यांच्यातील संबंधांचे आरोप फेटाळून लावत पाटील यांचा राष्ट्रवादीशी कोणताही संबंध नाही किंवा त्यांची कधी भेटही झाली नसल्याचे सांगितले.