सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 28 फेब्रुवारी 2024 (09:21 IST)

मुलांना नव्हे, आधी स्वत:ला शिस्त लावा” – डॉ. रोझिना राणा

Dr. Rosina Rana
facebook
जळगाव टीव्ही, इंटरनेट, मोबाइल आणि कॉम्प्युटरच्या जगात जन्माला येणारी नवी पिढी आधीपेक्षा वेगळी आहे, त्यांच्या समस्या वेगळ्या आहेत आणि सहाजिकपणे त्यांचे समस्या सोडवण्याचे मार्गही वेगळे आहेत. अशा परिस्थितीमध्ये आजच्या काळात मुलांचे संगोपन करताना, त्यांच्यावर संस्कार करताना पालकांच्या समोर नक्की काय आव्हाने आहेत हे आधी जाणून घेतले पाहिजे आणि पालक म्हणून आपण कुठे चुकत आहोत, याचे मूल्यमापन करून स्वत:मध्ये बदल घडवला पाहिजे. असे प्रतिपादन नागपूर येथील ज्येष्ठ बाल मानसोपचार तज्ज्ञ तथा लाईफ कोच डॉ. रोझिना राणा यांनी केले.
 
सावखेडा येथील जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूल येथे पालकांना मार्गदर्शन करतांना डॉ. रोझिना राणा बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल, रायसोनी पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका तेजल ओझा उपस्थित होत्या. जैन युवा फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल यांनी केले.

मार्गदर्शन करतांना डॉ. रोझिना राणा पुढे म्हणाल्या की, आजच्या काळात ‘मुलांना वाढवणं’ हे आव्हानात्मक आणि अत्यंत कठीण असं एक प्रकारचं ‘काम’ आहे असा चिंतेचा सूर आजच्या तरुण पालकांमध्ये असलेला दिसतो. पण खरं तर, पालकत्वाशी निगडित काही मूलभूत गोष्टी समजून घेतल्या तर हा अनुभव खूपच आनंददायी ठरू शकतो. पालक म्हणून मुलांना वाढवताना होणा‍र्‍या चुका ओळखून, त्या वेळीच कशा दुरुस्त कराव्यात याचं उत्कृष्ट मार्गदर्शन करतांना डॉ. राणा यांनी काही कळीचे मुद्देही विचारात घेतले जसे की, मुलांचं भावविश्व कसं जपावं ?, मुलांमध्ये आत्मविश्वास, महत्त्वाकांक्षा आणि आत्मप्रतिमा कशी निर्माण करावी?, मुलांचा अभ्यास व वर्तनासंदर्भातील समस्या कशा हाताळाव्यात? ‘३ Idiots ’ अर्थात टी.व्ही., मोबाईल आणि इंटरनेट या तीन ‘अविभाज्य घटकांशी’ कसा सामना करावा? या विविध बाबी मानसोपचारतज्ज्ञ म्हणून काम करत असताना आलेल्या अनुभवातून आणि अभ्यासातून डॉ. राणा यांनी पालकांसमोर मांडले.

Edited By - Ratnadeep Ranshoor