शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 10 एप्रिल 2023 (07:20 IST)

भामट्या एजंटांच्या फसवणुकीला बळी पडू नका : मुख्यमंत्री प्रमोद सावंत

pramod sawant
पणजी :सरकारी नोकरी देण्याच्या नावाखाली लाखोंचा गंडा घालणाऱ्या भामट्या एजंटांच्या फसवणुकीला बळी पडू नका, असा सल्ला गोवा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिला आहे. असे कोणीही एजंट नोकरी देण्याचे आश्वासन देऊन पैशांची मागणी करत असतील तर लगेच पोलिसांकडे किंवा मुख्यमंत्री कार्यालयात तक्रार दाखल करा, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.
 
सरकारात मोठे अधिकारी आणि मंत्र्यांचे हस्तक असल्याची बतावणी करून लोकांना गंडा घालणाऱ्या भामट्यांची टोळी राज्यात कार्यरत आहे. सरकारी नोकरीच्या मोहापायी कितीही मोठी रक्कम देण्यास तयार असलेल्याना हेरून हे भामटे मोठ्या हुद्याच्या सरकारी नोकऱ्या तसेच विविध सरकारी कंत्राटे मिळवून देण्याचे आमिष दाखवत होते. त्यातून इच्छुकांकडे लाखोंची मागणी करत होते व अनेकजण त्यांच्या आश्वासनांना बळीही पडत होते. त्यातूनच आतापर्यंत त्यांनी कित्येकांची सुमारे 4 कोटी ऊपयांची फसवणूक केली आहे.
 
अशाच दोघा भामट्यांना शुक्रवारी पणजी पोलिसांनी अटक केली आहे. समीर धावस्कर आणि दिनकर सावंत अशी त्यांची नावे असून त्यांच्या टोळीतील अन्य साथीदारांचा शोध जारी आहे. ज्या अर्थी सदर भामट्यांनी अस्सल वाटतील अशा प्रकारे सरकारी लेटरहेडवर नियुक्तीपत्रे जारी केली आहेत, ते पाहता सदर लेटरहेड त्यांना पुरवणारे काही सरकारी अधिकारीही त्या टोळीत पापाचे वाटेकरी असू शकतात, असा संशय पोलिसांना आहे. त्या दृष्टीनेही तपास सुरू आहे. 
 
Edited by : Ratnadeep Ranshoor