सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 13 ऑक्टोबर 2022 (21:06 IST)

शाळा नकोच आता! विद्यार्थी भाम धरणात उद्या करणार दप्तरांचे विसर्जन

school reopen
इगतपुरी : दरेवाडी जिल्हा परिषद शाळा सुरु झाल्याचा आनंद अल्पकाळ टिकला आहे. शिक्षण अधिकारी आणि जिल्हा परिषदेने शब्दांचा खेळ करून ही शाळा बंदच करण्याचा निर्धार केला आहे. येथील आदिवासी विद्यार्थ्यांना सायकलीचे आमिष दाखवले तरी विद्यार्थी बधले नाहीत. दरेवाडीची शाळा बंदच करण्याचे शिक्षण विभागाने ठरवले असल्याने अखेर आज विद्यार्थ्यांनी शाळेचा कायमचा निरोप घेतला.
 
दरम्यान, उद्या (दि. 14) सकाळी 11 वाजता 43 विद्यार्थ्यांचे दप्तर, वह्या, गणवेश, शैक्षणिक साहित्य जवळच असणाऱ्या भाम धरणात विसर्जन करण्याचा कार्यक्रम होणार आहे. ह्या कार्यक्रमाला इगतपुरी तालुक्यातील लोकप्रतिनिधी आणि शासकीय अधिकाऱ्यांनी शक्य झाले तर हजर राहावे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्याचा शेवट पाहण्यासाठी साक्षीदार व्हावे असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते भगवान मधे यांनी केले आहे. शनिवारी सकाळी 10 वाजता हे सर्व 43 विद्यार्थी आणि त्यांचे पालक राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी धडकणार आहेत. मुख्यमंत्री यांच्याकडे उदरनिर्वाह करण्यासाठी शेळ्या युनिट देण्याची आग्रही मागणी करण्यात येणार आहे. शेळ्या मिळत नाही तोपर्यंत तिथून हलणार नसल्याचे भगवान मधे म्हणाले आहेत.
पुनर्वसित असलेल्या दरेवाडी गावातील शाळा बंद करून अन्य शाळामध्ये विद्यार्थी समायोजन करण्याबाबत शिक्षण विभाग आग्रही आहे. विद्यार्थी पायपीट करीत पंचायत समितीमध्ये शाळा भरवण्यासाठी जात असताना गटशिक्षणाधिकारी निलेश पाटील यांनी त्यांना शाळा बंद करणार नसल्याचे लेखी आश्वासन दिले. मात्र नंतर केंद्रप्रमुख माधव उगले यांनी शाळा बंदचे पत्र वाचून दाखवले. त्यांना यावेळी पालकांनी मारहाण केली. तेव्हापासून शाळा बंदच होती. शेवटी दोन दिवसापूर्वी 43 विद्यार्थी जिल्हा परिषद कार्यालयात दप्तर जमा करून शेळ्या मागायला गेले. यावेळी अधिकाऱ्यांनी वेळ मारून नेली आणि पत्राचा शब्दखेळ केला. आता शिक्षण विभागाने ही शाळा बंदच करण्याचा घाट घातला असल्याचे आज पालकांना समजले.
सामाजिक कार्यकर्ते भगवान मधे यावेळी हजर होते. विद्यार्थ्यांच्या मागणीला आणि आंदोलनाला केराची टोपली दाखवली गेल्याने सर्वांनी संताप व्यक्त केला. शेवटी सर्व 43 विद्यार्थी घरी पाठवण्यात आले. आता आम्हाला विद्यार्थ्यांना शाळा शिकवायची नाही. म्हणून उद्या शुक्रवारी सकाळी 11 वाजता विद्यार्थ्यांचे दप्तर, वह्या, पेन, पुस्तके आणि शैक्षणिक साहित्य भाम धरणाच्या पाण्यात विसर्जन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
Edited by : Ratnadeep Ranshoor