मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 7 मे 2021 (09:10 IST)

औषधांचा काळाबाजार करणार्‍यांना भर रस्त्यात चोपले पाहिजे"

रितेश देशमुखने व्यक्त केला संताप
 
कोरोना संकटाच्या काळात औषधांच्या होणाऱ्या काळाबाजारवरून प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुखने संताप व्यक्त केलाय. औषधांचा काळाबाजार करणार्‍यांना भर रस्त्यात चोपले पाहिजे, असे रितेश देशमुखने म्हटले आहे. याबाबत त्याने ट्विट केले आहे.
 
नागपुरमध्ये एका कोरोना रुग्णाला रेमडेसिवीर इंजेक्शनऐवजी अॅसिडिटीचे इंजेक्शन देण्यात आले होते. नागपुरातील जामठा परिसरातील कोविडालय नावाच्या रुग्णालयात दिनेश गायकवाड नावाच्या पुरुष नर्सला आयसीयूमध्ये दाखल असलेल्या आणि अत्यवस्थ असलेल्या एका रुग्णाला लावण्यासाठी रुग्णालय प्रशासनाने तीन रेमडेसिवीर इंजेक्शन दिले होते. 
 
दरम्यान, दिनेश गायकवाड म्हणजेच आरोपी पुरुष नर्सने तीनपैकी दोन रेमडेसिवीर इंजेक्शन आपल्याकडे ठेवले आणि त्याऐवजी अत्यवस्थ रुग्णाला चक्क अॅसिडिटीचे इंजेक्शन टोचले. 
 
त्यानंतर रुग्णालयातील रेकॉर्डवर संबंधित रुग्णाला विशिष्ट कालावधीत तीन रेमडेसिवीर इंजेक्शन टोचल्याची नोंद केली. या धक्कादायक घटनेवरून रितेशने संताप व्यक्त केला आहे.