शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 2 जून 2023 (21:36 IST)

चक्रीवादळामुळे मान्सून मुंबईत १४ ऐवजी १७ जूननंतर दाखल होण्याची शक्यता

monsoon
मान्सून आठ दिवस उशिराने बंगालच्या उपसागरात दाखल झाला आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत मान्सून मालदीव बेटे, कौमारिन क्षेत्र व बंगालच्या उपसागरातील काही भाग व अरबी समुद्रातील काही भागांत दाखल होण्यासाठी अनुकूल स्थिती असल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने म्हटले आहे.
 
मान्सूनने ३० मे रोजी नैऋत्य बंगालच्या उपसागराचा काही भाग, आग्नेय बंगालच्या उपसागराचा काही भाग, तसेच संपूर्ण अंदमान व निकोबार बेटे, अंदमान समुद्र आणि पूर्वमध्य बंगालच्या उपसागराच्या काही भागांमध्ये आगेकूच केली. तीन दिवसांत प्रवास बंगालच्या उपसागरात होण्याचा अंदाज होता. मात्र, बुधवारीच तो बंगालच्या उपसागरात दाखल झाला.
 
येत्या दोन ते तीन दिवसांत त्याची आणखी प्रगती अपेक्षित असून, तो मालदीव बेटे, कौमारिन क्षेत्र व बंगालच्या उपसागरातील काही भाग व अरबी समुद्रातील काही भागात दाखल होण्यासाठी अनुकूल स्थिती असल्याचे हवामानशास्त्र विभागाने म्हटले आहे. मान्सून अरबी समुद्राकडील बाजूने केरळमधून भारतामध्ये दाखल होतो. यंदा तो ४ जूनला दाखल होण्याचा अंदाज यापूर्वीच जाहीर केला आहे. सध्या केरळमध्ये दाखल होण्याच्या त्याच्या सामान्य तारखेच्या तुलनेत आठ दिवस उशीर झाला. मात्र, हा वेळ भरून निघेल, अशी माहिती हवामान अंदाज विभागाचे प्रमुख डॉ. अनुपम काश्यपी यांनी दिली.
 
मुंबईत लेटमार्क?
केरळमध्ये ३ ते ४ जूननंतर मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रात ७, ८ आणि ९ जूनदरम्यान चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता असून, हे चक्रीवादळ कोकण किनारपट्टीहून गुजरात, सौराष्ट्रकडे मार्गक्रमण करेल.
चक्रीवादळामुळे मान्सून मुंबईत १४ ऐवजी १७ जूननंतर दाखल होण्याची शक्यता हवामानविषयक माहिती देणाऱ्या ‘वेगरिज ऑफ दी वेदर’ या संस्थेने वर्तविली.
दक्षिण कोकणात मान्सूनचे आगमन १० ते १२ जूनदरम्यान होईल. मुंबईत मान्सूनपूर्व पावसाची हजेरी ७ जूननंतर लागेल.
Edited By-Ratnadeep Ranshoor