1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 1 जून 2023 (20:51 IST)

अरबी समुद्रात चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता, मान्सूनवर काय परिणाम होणार?

monsoon
नैर्ऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सून साधारणतः 1 जूनपर्यंत भारतात दाखल होत असतो. पण यंदा मान्सून केरळमध्ये उशिरा पोहोचण्याची शक्यता आहे.
 
पण दुसरीकडे मान्सून सुरू होतानाच अरबी समुद्रात चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे.
 
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गुरूवारी 1 जूनला मान्सूनने अरबी समुद्रात प्रगती केली आहे. मालदीवसह दक्षिण भारत आणि पश्चिम श्रीलंकेलगत असलेल्या कोमोरीन भागात मान्सून दाखल झाला आहे.
 
तसेच येत्या एक-दोन दिवसांत मान्सून आणखी पुढे सरकण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. यापूर्वी भारतीय हवामान विभागाने आपल्या अंदाजात मान्सून वेळेपेक्षा उशिरा दाखल होण्याची शक्यता वर्तविली होती.
 
पण आता अरबी समुद्रात वादळसदृश परिस्थिती निर्माण होण्याचा धोका आहे. येत्या आठवडाभरात ही ते तयार होण्याची शक्यता आहे.
 
वादळ कोणत्या तारखेला येईल?
हवामान विभागाने प्रसिद्ध केलेल्या बुलेटिनमध्ये असं म्हटलंय की, "5 जूनला अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण होईल. दोन दिवसांत कमी दाबाचं क्षेत्र वाढत जाऊन 7 जून पर्यंत त्याचं चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता आहे."
 
खासगी हवामान संस्था स्कायमेटने वर्तविलेल्या अंदाजानुसार, जूनच्या दुसऱ्या आठवड्यात अरबी समुद्रात चक्रीवादळ येण्याची शक्यता आहे.
 
यावर अ‍ॅक्युवेदरचे शास्त्रज्ञ जेसन निकोलस म्हणाले की, 3 किंवा 4 जूनच्या आसपास अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे.
 
चक्रीवादळाच्या निर्मितीसाठी समुद्राच्या पृष्ठभागाचं तापमान 27 अंश सेल्सियस एवढं असावं लागतं. सध्या अरबी समुद्राचं तापमान 31 अंश सेल्सिअसच्या आसपास असून हे तापमान चक्रीवादळ निर्मितीस अनुकूल आहे.
 
समुद्राच्या पृष्ठभागाच्या तापमानात वाढ झाली की कमी दाबाचं क्षेत्र तयार होऊन ही यंत्रणा मजबूत होते. आणि त्याचं चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता असते.
 
हवामानाचा अंदाज सांगण्यासाठी वेगवेगळी मॉडेल्स वापरल्यामुळे वादळाची तारीख आणि क्षेत्र याबद्दल वेगवेगळी माहिती मिळते. त्यामुळे वादळ नेमकं कोणत्या तारखेला येणार याविषयी निश्चित काही सांगता येणार नाही.
 
हे चक्रीवादळ महाराष्ट्राच्या किनारपट्टीला धडकणार का?
अरबी समुद्रात तयार होत असलेल्या या चक्रीवादळाचा गुजरातसह महाराष्ट्राच्या किनारपट्टीलाही धोका आहे. साधारणपणे केरळ किंवा मालदीवच्या आसपास तयार होणारी चक्रीवादळ उत्तरेकडे सरकतात.
 
पण बऱ्याचदा अरबी समुद्रात तयार होणारं हे वादळ महाराष्ट्र आणि गुजरातकडे सरकण्याऐवजी ओमानकडे जाण्याची शक्यता असते.
 
शिवाय कित्येकदा चक्रीवादळ समुद्रातच तयार होऊन समुद्रातच विरून जातं. मात्र त्याचा परिणाम महाराष्ट्रासह गुजरातवरही होण्याची शक्यता असते.
 
यामुळे महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात आणि मुंबईमध्ये जोरदार अतिवृष्टी होऊ शकते.
 
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानंतर वादळ कोणत्या दिशेने सरकणार हे निश्चित होईल.
 
हवामानाच्या वेगवेगळ्या मॉडेल्समुळे चक्रीवादळाचा मार्गही वेगवेगळा दिसत आहे. युरोपियन सेंटर फॉर मिडीयम रेंज वेदर फॉरकास्ट संस्थेच्या अंदाजानुसार, हे वादळ गुजरातच्या दिशेने सरकेल. तर ग्लोबल फॉरकास्ट संस्थेच्या अंदाजानुसार, हे वादळ दक्षिण भारताच्या किनारपट्टीपासून दूर राहील.
 
वादळ आले तर मान्सूनला उशीर होईल का?
मान्सूनचं भारतात आगमन होत असताना जर बंगालचा उपसागर, अरबी समुद्र आणि हिंदी महासागरात काही हालचाली झाल्या तर त्याचा मान्सूनवर परिणाम होतो.
 
स्कायमेटचे शास्त्रज्ञ महेश पलावत सांगतात की, अरबी समुद्रातील वादळं आपल्या केंद्राकडे आर्द्रता खेचतात, परिणामी भारतातील अनेक भागात मान्सूनला विलंब होण्याची शक्यता आहे.
 
दुसरीकडे चक्रीवादळ तयार होऊन उत्तरेकडे सरकल्यास महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थानमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे.
 
पण जर चक्रीवादळ महाराष्ट्राच्या किनार्‍यापासून दूर गेलं किंवा समुद्रातच विरलं तर मात्र राज्यात मान्सूनपूर्व पाऊस पडण्याची शक्यता आहे.
 
चक्रीवादळांचा मान्सूनवर कसा परिणाम होतो?
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या एका वृत्तानुसार, कोचीन विद्यापीठाच्या एस टी रडार केंद्रातील संशोधकांनी दिलेल्या अहवालात असं म्हटलंय की, गेल्या काही वर्षांपासून अरबी समुद्रात आलेल्या वादळांमुळे भारतातील मान्सून विस्कळीत झाला आहे.
 
या अहवालानुसार, मान्सूनच्या आगमनापूर्वी अरबी समुद्रात चक्रीवादळांच्या संख्येत वाढ झाली होती. तर बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळांची संख्या यावेळी कमी झाली.
 
एका नवीन अभ्यासानुसार, अरबी समुद्रातील वादळं आपल्या केंद्राकडे आर्द्रता खेचतात, परिणामी पश्चिम किनारपट्टीवर कमी पाऊस पडतो.
 
डाउन टू अर्थच्या अहवालानुसार, गेल्या वर्षी एप्रिल आणि मे महिन्यात काही मोठी वादळं आली होती, त्यातल्या काहींमुळे मान्सूनच्या आगमनात व्यत्यय आला. अनेक वादळांमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे मान्सून लवकर दाखल झाला.
 
गेल्या वर्षी मे महिन्यात 'असानी' चक्रीवादळ आलं होतं. त्यामुळे बंगालच्या उपसागरात मान्सूनची प्रगती थांबली. मात्र हवामान खात्याच्या अंदाजापेक्षा दोन दिवस आधीच मान्सून केरळमध्ये दाखल झाला.
 
गेल्या वर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीच्या महिन्यांत तुलनेनं कमी पाऊस पडला होता.
 
2021 मध्ये मान्सून सुरू झाला तेव्हा दोन वादळं आली होती. मे महिन्याच्या दुसऱ्या आणि तिसर्‍या आठवड्यात अरबी समुद्रात 'तौक्ते' चक्रीवादळ तयार झालं.
 
हे वादळ देशाच्या पश्चिम भागात धडकल्यामुळे बंगालच्या उपसागराच्या आसपासच्या भागात मान्सूनच्या आगमनावर परिणाम झाला.
 
तर त्याच वर्षी 'यास' नावाचं दुसरं चक्रीवादळ धडकलं होतं. मे महिन्याच्या दरम्यान बंगालच्या उपसागरात त्याची निर्मिती झाली होती. मात्र या वादळामुळे बिहार आणि काही भागात मान्सून लवकर दाखल झाला तर काही भागात पूरस्थिती निर्माण झाली होती.
 
चक्रीवादळाच्या परिस्थितीचा मान्सूनच्या आगमनावर कसा परिणाम होतो यावर बोलताना जुनागढ कृषी विद्यापीठाचे तांत्रिक अधिकारी धिमंत वघासिया सांगतात, "चक्रीवादळ आल्यावर वातावरणातील आर्द्रता निघून जाते. वादळ जर जमिनीच्या दिशेने येत असेल तर मान्सून लवकर येऊ शकतो.
 
पण तयार झालेलं चक्रीवादळ जेव्हा समुद्रातच घोंगावतं तेव्हा प्रणाली पुन्हा तयार व्हायला वेळ लागतो आणि मान्सून पुढे सरकतो."