तुमच्या सोबत ५ आमदारही आले नसते
शिर्डी : शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन दिवसीय शिबीर शिर्डी येथे सुरू आहे. या शिबिरात शरद पवार गटाच्या अनेक नेत्यांनी राष्ट्रवादीतून बंड केलेल्या अजित पवार यांच्या गटावर जोरदार निशाणा साधला आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनीही अजित पवार गटावर शेलक्या शब्दांत टीका केली आहे. पवार साहेबांना आमदार दबावापोटी सोडून गेले, हे प्रेमापोटी कोणी गेले नाही. जर तुम्ही सत्तेच्या बाहेर असता तर तुमच्या सोबत ५ देखील आमदार आले नसते, पण तुम्ही सत्तेबरोबर आहात, ईडीचा धाक आहे म्हणून तुमच्या बरोबर आमदार आले आहेत. आज इथे जे कार्यकर्ते थांबलेले आहेत ते शरद पवारांच्या विचारांनी थांबलेले आहेत, असा हल्लाबोल शेख यांनी केला आहे.
अजित पवार यांच्यावर टीकास्त्र सोडताना महेबूब शेख यांनी पुढं म्हटले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ५४ आमदार निवडून आले ते फक्त शरद पवार साहेबांच्या चेहऱ्याकडे बघून निवडून आलेत. आता काही लोक सांगतात की, साहेबांनी ३८ व्या वर्षी निर्णय घेतला, आम्ही ६० व्या वर्षी निर्णय घेतला. यांनी जर ३८ व्या वर्ष निर्णय घेतला असता तर सरपंच तरी त्यांच्याबरोबर आला असता का? शरद पवार साहेबांनी ३८ व्या वर्षीच्या वेळी निर्णय घेतला त्यावेळी परिस्थिती तशी होती आणि एका वृत्तपत्राला बातमी होती की, हे सरकार जावे ही श्रींची इच्छा आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची याला परवानगी होती. त्या परवानगीने घरात कोणताही राजकीय वारसा नसताना स्वतःच्या हिंमतीवर ३८ व्या वर्षी मुख्यमंत्री असायला शरद पवार व्हावे लागते, असा टोला शेख यांनी लगावला आहे.