Last Modified शनिवार, 24 एप्रिल 2021 (22:00 IST)
थेरगाव येथील केमिकल कंपनीत मॅग्नेशियम पावडरचा भीषण स्फोट झाला आहे. स्फोट एवढा भीषण होता की सिमेंटच्या भिंती तुटून पडल्या आहेत. या स्फोटामुळे लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
महापालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी किरण गावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पद्मजी पेपर मिलच्या पुढील बाजूस छोटी केमिकल कंपनी आहे. या केमिकल कंपनीत मॅग्नेशियम पावडरचा स्फोट झाला. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे गावडे म्हणाले.
घटनास्थळी पिंपरी अग्निशमन दलाच्या दोन, रहाटणीतील एक आणि प्राधिकरण येथील एक, असे अग्निशमन दलाचे एकूण चार बंब आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम करत आहेत, असे गावडे यांनी सांगितले.