शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 10 डिसेंबर 2020 (10:49 IST)

माजी आदिवासी विकास मंत्री,पालघर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री विष्णू सवरा यांचे दीर्घ आजाराने निधन

माजी आदिवासी विकास मंत्री,पालघर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री विष्णू सवरा (वय ७२) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे. त्यांची अंत्ययात्रा आज दुपारी १२ वाजता वाडा येथील निवासस्थानातून निघणार आहे. मितभाषी, संवेदनशील आणि कर्तव्यदक्ष व्यक्तित्व असलेले सावरा विधानमंडळाचे अनुभवी सदस्य होते. राज्याचे आदिवासी विकास मंत्री म्हणून त्यांनी काम पाहीले होते. 
 
१९८० मध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया मधील मोठ्या पगाराची नोकरी सोडून ते भारतीय जनता पक्षाचे पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून कार्यरत झाले. १९८० च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना भारतीय जनता पक्षाने वाडा मतदार संघात उमेदवारी दिली. मात्र या निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला. १९८५ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपाकडून पुन्हा वाडा मतदार संघातून निवडणूक लढवली. यावेळीही त्यांचा निसटता पराभव झाला. दोन वेळा पराभव पत्करुनही त्यांनी आपले सामाजिक कार्य सुरुच ठेवले होते.
 
सन १९९० च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना भाजपाने वाडा मतदार संघातून पुन्हा उमेदवारी दिली. यावेळी मात्र त्यांनी विजय प्राप्त करुन आमदार होण्याचे स्वप्न पूर्ण केले. या निवडणुकी नंतर झालेल्या सन २०१४ पर्यंतच्या सर्व विधानसभा निवडणुकीत त्यांनी विजय मिळवून सातत्याने सहावेळा विजयी होण्याचा सन्मान मिळविला.
 
सन १९९५ च्या युती सरकारच्या काळात त्यांना शेवटच्या टप्प्यात १ फेब्रुवारी १९९९ रोजी आदिवासी विकास मंत्री होण्याचा मान मिळाला. अवघे सहा महिने मिळालेल्या मंत्रीपदातून त्यांनी अनेक विकासाची कामे केली.