रायगड किल्ला आणि परिसराचा विकासाठी निधी कमी पडू देणार नाही : अजित पवार
महाविकास आघाडीचे सरकार रायगड किल्ला आणि परिसर विकासाचे काम पूर्णत्वाला नेणार आहे. रायगड किल्ल्याचा आणि परिसराचा विकास करण्यासाठी प्राधिकरणाला निधी कमी पडू देणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. रायगड किल्ला व परिसर विकास पर्यटन आराखडा प्राधिकरणाची कामे गतीने व्हावीत. कामांची गुणवत्ता, दर्जा कायम राखावा, या विकास कामांना गती मिळण्यासाठी सांस्कृतिक कार्यविभाग, पर्यटनविभाग, पुरातत्व विभाग, जिल्हा प्रशासन यांनी समन्वय राखून प्राधिकरणाला कामकाजात सहकार्य करावे, असे निर्देश त्यांनी दिले.
रायगड किल्ला परिसरातील २१ गावांचा विकास व्हावा, स्थानिकांना पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी शासन प्रयत्नशील आहे. प्राधिकरणाच्या कामकाजात कोणतीही अडचण येऊ नये यासाठी रायगड जिल्हा नियोजन समितीला निधी उपलब्ध करून देण्यात येईल. या निधीचा विनियोग पालकमंत्री, जिल्हा प्रशासन आणि प्राधिकरणाने समन्वयाने करावा.
राजमाता जिजाऊ माँसाहेबांचा वाडा, समाधीचे संवर्धन, जतन करण्याचे काम, शिवसृष्टी उभारणी अशी नियोजित सर्व कामे शास्रोक्त पद्धतीने करावीत. ऐतिहासिक वारसा सांगणाऱ्या वास्तूंचे जतन आणि संवर्धन करावे, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.