किरीट सोमय्या यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे
भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. शॉक दिल्याशिवाय त्यांची बेताल बडबड थांबणार नाही अशी घणाघाती टीका शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी केली आहे. राज्याचे पाणी पुरवठा मंत्री आणि शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांना किरीट सोमय्यांनी अन्वय नाईक प्रकरणावरुन शिवसेनेवर केलेल्या आरोपांबाबत जेव्हा प्रतिक्रिया विचारली तेव्हा गुलाबराव पाटील यांनी हे वक्तव्य केलं आहे.
किरीट सोमय्या हे बेताल बडबड करत आहेत. त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. शॉक दिल्याशिवाय त्यांची ही बडबड थांबणार नाही. त्यांनी ठाण्यातील रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावेत असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे. ठाकरे कुटुंबीयांच्या पायाजवळ बसून किरीट सोमय्या खासदार झाले. ते ठाकरे कुटुंबावरच टीका करत आहेत. हा माणूस अत्यंत कृतघ्न आहे अशीही टीका गुलाबराव पाटील यांनी जळगावमध्ये बोलताना केली.