आरोग्य विद्यापीठ आय.आय.टी. बॉम्बेतर्फे आरोग्य प्रणालीतील संशोधन आणि नवकल्पना यावर परिषद
तज्ज्ञांनी एकत्र येऊन विचार विनिमय करुन समाजाला संशोधनासाठी समाजाच्या आरोग्य प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी संशोधनाला नवी दिशा देण्याचे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय आरोग्य तज्ज्ञ डॉ. सुभाष हिरा यांनी केेले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ व आय.आय.टी. बॉम्बे यांच्या संयुक्त विद्यमाने हेल्थ मॅनेजमेंट इन पोस्ट कोविड-19 वर्ड संकल्पनेवर संगम-2023(Summit of Academia Networking with Government, Allied Health & Medical Professionals Conference on Health Systems Research & Innovation) आंतरराष्ट्रीय शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेच्या उद्घाटन समारंभाप्रसंगी राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक, आय.आय.टी. पवईचे संचालक प्रा. सुभाशिष चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी आंतरराष्ट्रीय आरोग्य तज्ज्ञ डॉ. सुभाष हिरा यांनी सांगितले की, सार्स, स्वाईन फ्ल्यु, इबोला, एच.आय.व्ही. अश्या अनेक गोष्टींमुळे समाजाचे आरोग्य धोक्यात आले आहे. अश्या रोगांच्या लाटा येत असतात आणि जात असतात. त्याचे दूरगामी परिणाम मानवी जीवनावर होत असते. कोविडमुळे जागतिक स्तरावर सर्वच क्षेत्रांमध्ये गंभीर स्वरुपाचे परिणाण पहावयास मिळत आहे. अश्या सर्व प्रश्नांच्या समस्यांच्या सोडवणूकीसाठी शासन व्यवस्था, आरोग्य सेवक आणि आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी एकत्र येऊन सातत्याने विचार विनिमय केला पाहिजे. अशा स्वरुपाच्या परिषदांची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
विद्यापीठाच्या कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) प.वि.से.प., अ.वि.से.प., वि.से.प यांनी सांगितले की, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ अशा प्रकारच्या आंतराष्ट्रीय स्तरावरील संशोधन परिषदेच्या स्वरुपात होत आहे ही विशेष महत्वपूर्ण बाब आहे. वेगवेगळया ठिकाणहून आलेले तज्ज्ञ, वेगवेगळया स्तरांवर, वेगवेगळया क्षेत्रात कार्यरत असलेले आरोग्य तज्ज्ञ यांच्यातील विचार-विनीमय या संमग परिषदेच्या निमित्ताने होत असल्याचे त्यांनी सांगितले.
त्या पुढे म्हणाल्या की, विद्यापीठाच्या विभागीय केंद्रांच्या विकास करुन त्या विभागातील आरोग्य व शैक्षणिक विकास करण्यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील आहे. छत्रपती संभाजी नगर येथील विभागीय केंद्रामार्फत डिप्लोमा इन ऑप्थाल्मिक सायन्स, ऑप्टोमेट्री हा पदविका अभ्यासक्रम व बी.एस्सी. ऑप्टोमेट्री हा पदवी अभ्यासक्रम शिकण्यात येणार आहे. या इमारतीमध्ये नेत्ररुणांसाठी ओपीडी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली असून त्याचा नेत्र रुग्णांना उपयोग होणार आहे. तसेच पुणे येथील जीनहेल्थ लॅबच्या माध्यमातून कर्करोग आणि अनुवांशिक विकार असलेल्या रुग्णांन समुपदेशन करण्यात येणार आहे. कर्करोग आणि अनुवांशिक विकारांचे निदान करण्यासाठी चिकित्सकांना जीन हेल्थ लॅबव्दारा प्रशिक्षण देण्यात येणार आहे. विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी वर्षात अनेक उपक्रम राबविण्यात येत असून विभागीय केंद्राचा विकास करण्यासाठी आजचा टप्पा उल्लेखनीय असेल असे त्यांनी सांगितले.
राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव श्रीमती सुजाता सौनिक यांनी संगितले की, शैक्षणिक, आरोग्य व तंत्रज्ञान क्षेत्रातील समस्या सोडविण्यासाठी परिषदा महत्वपूर्ण आहेत. या क्षेत्रातील अद्ययावत ज्ञानाचे आदान-प्रदान होणे गरजेचे आहे. याकरीता विशेष कार्यपध्दतीचा वापर करणे आवश्यक आहे. शासकीय स्तरावर कार्यवाही न होता वैयक्तीक पातळीवर प्रत्येकाचा सहभाग आरोग्य समस्या सोडविण्यासाठी महत्वपूर्ण आहे. समाजात कुपोषण व बालकांमधील अनेक आजार गंभीर स्वरुपाचे असून त्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील रहावे. संगम 2023 च्या माध्यमातून आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन यासाठी प्रभावी ठरेल असे त्यांनी सांगितले.
चौकट
कुलगुरु डॉ. मृदुला फडके यांच्या हस्ते आरोग्य विद्यापीठाचे छत्रपती संभाजी नगर येथील विभागीय केंद्र व पुणे येथील जीन हेल्थ लॅब ओपीडीचा शुभारंभ झाला. संशोधनामुळेच समाजाच्या आरोग्याचे प्रश्न सुटू शकतील असे प्रतिपादन आरोग्य विद्यापीठाच्या माजी कुलगुरु डॉ. मृदुला फडके यांनी केले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या छत्रपती संभाजी नगर येथील विभागीय केंद्राचे व पुणे येथील जीनहेल्थ लॅब येथील जनुकीय सल्ला केंद्राचे उद्घाटन महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ माजी कुलगुरु डॉ. मृदुला फडके यांच्या हस्ते करण्यात आले.
Edited By-Ratnadeep Ranshoor