शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 2 जानेवारी 2023 (07:40 IST)

जिंदाल पॉलिफिल्म कंपनीत भीषण आग, 2 ठार

fire jindal
मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल, मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत, 
जखमींच्या उपचाराचा खर्च सरकार करणार  
नाशिक : प्रतिनिधी 
नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथे असलेल्या जिंदाल पॉलिफिल्म  या कंपनीत भीषण आग लागली. सकाळी ११ वाजेच्या सुमारास मोठ्या स्फोटाद्वारे लागलेल्या आगीचे रौद्ररुप धारण केले. आग विजवण्यासाठी जिल्हाभरातील अग्निशमन बंब येथे दाखल झाले. अग्नीशमन दलाच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर आग नियंत्रण मिळविण्यात यश येत नसल्यामुळे  थेट लष्करालाही पाचारण करण्यात आले आहे. लष्कराची एक तुकडी घटनास्थळी दाखल झाली. सोबतच एनडीआरएफ, एसडीआरएफ, जिल्हा आपत्ती मदत व बचाव पथक कार्यरत झाली.
 
मुंबई-आग्रा महामार्गावर असलेल्या जिंदाल कंपनीत रविवारी सकाळी मोठा स्फोट झाला. या गंभीर अपघाताची दखल घेत पोलिस, आरोग्य आणि विविध विभागांचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले . मदत आणि बचावकार्य हाती घेण्यात आले . जिल्ह्यातील सर्व अग्निशमन बंब आणि अॅम्ब्युलन्स घटनास्थळी सेवा देत  आहेत. आग आणि धुराच्या लोटाने परिसरात खळबळ उडाली. या कारखान्यात पॉलिफिल्मची निर्मिती केली जाते. येथे अनेक रसायने असतात. त्यामुळेच आग आणखीन तीव्र झाली. 
 
या आगीच्या दुर्घटनेत मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत 2 जण ठार तर20 जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. जखमींवर नाशिकच्या सुयश आणि धामणगाव येथील एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. यातील काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगिचले जाते. नाशिकच्या सुयश हॉस्पिटलमध्ये 14 जखमींना उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. यातील 4 जणांची प्रकृती अतिशय चिंताजनक असल्याचे सांगितले जाते. तर, नाशिकच्या आयसीयू ट्रॉमा सेंटरंमध्ये चार जखमींवर उपचार सुरू करण्यात आले. यातील दोन जखमी महिलांचा मृत्यू झाल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. महिमा (वय 20) आणि अंजली (वय 27) असे मृत महिलांची नावे आहेत. या दोन्ही कंपनीच्या कर्मचारी आहेत.
Edited by : Ratnadeep Ranshoor