शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 15 ऑक्टोबर 2021 (23:40 IST)

‘…तर आज मुख्यमंत्री झालो असतो’ – छगन भुजबळ

राष्ट्रवादीचे नेते आणि अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांचा आज (शुक्रवारी) वाढदिवस आहे. आज त्यांनी 75 व्या वर्षात पदार्पण केलं आहे. दरम्यान आजच त्यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. मी शिवसेना आणि काँग्रेस सोडली नसती तर आज मुख्यमंत्री नक्कीच झालो असतो. अशी भावना छगन भुजबळ यांनी व्यक्त केली.
 
ज्यांच्या सभेत आपण भाषणं दिली, ते आज मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री झाले आहेत. माझे अनेक सहकारी पुढे गेले. मी मुख्यमंत्री किंवा केंद्रीय मंत्री होऊ शकलो नाही. त्याबद्दल आता खंत व्यक्त करण्यात अर्थ नाही. तसंच मी शिवसेना किंवा काँग्रेस सोडली नसती तर आज नक्कीच मुख्यमंत्री झालो असतो. असं छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी म्हटलं आहे.
 
शरद पवारांसोबत (Sharad Pawar) काँग्रेस सोडतानाही दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदासाठीची संधी चालून आली होती. तेव्हा विलासराव देशमुख विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले होते. काँग्रेसच्या नेतृत्वाने मला मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली. सोनिया गांधींचे सचिव व्ही. जॉर्ज यांच्यासह शीला दीक्षित, राजेश पायलट यांनी माझ्याशी संपर्क करून परत येण्याची सूचनाही केली. मात्र मी पवारांसोबतच कायम राहायचे ठरविले. असं ते म्हणाले.
 
पुढे बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, शिवसेना सोडतानाचा काळ सर्वांत कठीण होता.
पण ओबीसींच्या न्याय्य हक्कांसाठी मला शिवसेना सोडावी लागली.शिवसेना सोडण्याचे तोटेही मला सहन करावे लागले. शिवसेना सोडली नसती, तर शिवसेनेचा पहिला मुख्यमंत्री मीच राहिलो असतो.मातोश्रीवर गेल्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीच मला हे सांगितले होते.मुख्यमंत्रीपदापेक्षाही ओबीसींना आरक्षण मिळवून दिले, हा माझ्यासाठी मोठा आनंद आहे, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.