चित्रा वाघ यांच्याविरोधात तत्काळ गुन्हा दाखल करावा; माजी आमदार दीपिका चव्हाण
भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी शिवसेनेचे उपनेते रघुनाथ कुचिक यांच्याविरोधात एका तरुणीवर दबाव आणताना बलात्काराची खोटी तक्रार देऊन पोलिसांकडे विशिष्ट जबाब नोंदवण्यास भाग पाडल्याचा गौप्यस्फोट संबंधित पीडित तरुणीने केला आहे. या प्रकरणातून राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांना बदनाम करण्याचं षडयंत्र रचल्याचं समोर आलं असून चित्रा वाघ यांचे पितळ मात्र उघडे पडले आहे. सत्तेसाठी वाघ यांनी एवढ्या खालच्या पातळीवर राजकारण करु नये. राज्य महिला आयोगाने पीडित तरुणीला न्याय मिळवून द्यावा आणि चित्रा वाघ यांच्याविरोधात तत्काळ गुन्हा दाखल करावा, अशी मागणी राज्य महिला आयोगाच्या सदस्या व माजी आमदार दीपिका चव्हाण यांनी केली आहे.
याबाबत बोलताना सौ.चव्हाण म्हणाल्या, भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी षडयंत्र रचून शिवसेनेचे उपनेते आणि भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस रघुनाथ कुचिक यांच्याविरोधात एका पीडित तरुणीला बलात्कार आणि जबरदस्तीनं गर्भपात केल्याचा खोटा गुन्हा दाखल करण्यास भाग पाडले. या पीडित तरुणीने धक्कादायक खुलासा करताना भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आपल्याला गोव्यात आणि मुंबईत डांबून ठेवले, पोलिसांना विशिष्ट जबाब द्यायला भाग पाडलं. वाघ यांनी मेसेजचे पुरावे खोटे सादर करून कुचीक यांच्या नावाने एक खोटे पत्र पोलिसांना देण्याची जबरदस्तीही आपल्यावर केली. हे पत्र कुचिक यांनी दिल्याचं भासवण्यासाठी वाघ यांच्याकडून माझ्यावर दबाव टाकला जात आहे, असा खळबळजनक आरोप या पीडित तरूणीने केला आहे.
चित्रा वाघ या राज्यातील आघाडी नेत्यांवर सातत्याने खोटे आरोप करून चर्चेत राहण्याचा प्रयत्न करतात. मात्र पीडित तरुणीने केलेल्या आरोपांनंतर चित्रा वाघ यांचे पितळ उघडे पडले आहे. या प्रकरणात वाघ यांनी पीडित तरुणीच्या जखमेचे भांडवल करताना कुचिक यांचीही बदनामी केली आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी अशा प्रकारे मुलींचा गैरवापर करणे धक्कादायक असून अत्यंत चुकीचे आहे. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन पीडित तरुणीला न्याय मिळवून द्यावा आणि चित्रा वाघ यांच्याविरोधात तत्काळ गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही माजी आमदार चव्हाण यांनी केली आहे.