नाशिकच्या पालक मंत्रिपदी गिरीष महाजन यांच्या नियुक्तीचे संकेत
स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण कोणाच्या हस्ते होणार याचा प्रश्न सोडवताना गिरीश महाजन यांच्याकडे नाशिकचे पालकमंत्रिपद देण्याचे संकेत देण्यात आले आहेत.महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार असल्याने ही चर्चा सुरू झाली आहे, तर दादा भुसे यांच्या हस्ते धुळ्याला ध्वजारोहण करण्यात येणार आहे. जिल्ह्यातून दादा भुसे यांना संधी मिळाली आणि उत्तर महाराष्ट्राला पाच मंत्रिपदे देण्यात आली असली तरी अद्याप पालकमंत्री घोषित झालेले नाहीत.
त्यातच यंदा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव असल्याने ध्वजारोहण कोणाच्या हस्ते होणार, अशी चर्चा सुरू झाली होती.
आता यासंदर्भातील यादी शासनाने घोषित केली आहे. त्यात नाशिकमध्ये माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार असल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांच्याकडेच पालकमंत्रिपद जाणार असल्याचे संकेत दिले जात असल्याची चर्चा आहे.
राज्याातील सत्ता बदलानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला होता. त्यामुळे विरोधकांकडून टीका होत असतानाच याच आठवड्यात तोही पूर्ण झाला. नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी गिरीश महाजन, दादा भुसे यांच्याबरोबरच शेजारील नगर जिल्ह्यातील राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नावाची चर्चा होती.
मात्र, यापूर्वी महाजन यांनी नाशिकचे पालकमंत्रिपद भूषवले आहे. त्याचप्रमाणे नाशिक महापालिकेतील सत्ता सूत्रे त्यांच्याकडूनच हलवली जात होती. आताही महापालिकेच्या तोंडावर त्यांच्याकडेच नाशिक महापालिका प्रभारी म्हणून भाजपाने जबाबदारी दिली आहे. या सर्व घडामोडींमुळे पालकमंत्रिपद त्यांच्याकडे जाईल, अशी अटकळ बांधली जात होती.
आता स्वातंत्र्य दिनी नाशिकमधील ध्वजारोहणाची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आल्याने तेच नाशिकचे नवे पालकमंत्री असतील, अशी चर्चा सुरू झाली आहे. दादा भुसे यांच्या हस्ते धुळे येथे ध्वजारोहण करण्यात येणार आहे.