बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 28 ऑगस्ट 2023 (08:35 IST)

अजित पवारांसाठी आता परतीची दारं बंद? बारामतीत सुप्रिया सुळेंविरोधात प्रचार करणार?

supriya sule ajit panwar
एकाबाजूला अजित पवार यांनी भाजपसोबत सत्तेत सामील झाल्यानंतर पहिल्यांदाच थेट बारामतीत सभा घेत मोदी सरकारच्या विविध योजनांचाच पाढा वाचला. तर दुसऱ्याबाजूला शरद पवार यांनी अजित पवार यांना उद्देशून केलेलं, ‘पुन्हा संधी द्यायची नसते.’ हे वक्तव्य केलं.
 
यामुळे आता शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील फूट स्पष्ट झाली आहे का? अजित पवार यांच्यासाठी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परतीची दारं आता बंद झाली आहेत का? असा प्रश्न विचारला जात आहे.
 
“संधी सारखी मागायची नसते आणि मागितली तरी द्यायचीही नसते,” अशी प्रतिक्रिया देत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी 25 ऑगस्ट रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत आपली भूमिका अखेर स्पष्ट केली.
 
खरंतर यापूर्वीही अनेकदा अजित पवार यांनी शरद पवार यांच्या विपरीत भूमिका घेतली आहे. इतकंच नाही तर 2019 मध्ये थेट भाजपसोबत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती.
 
अजित पवार पक्षात नाराज आहेत, नॉट रिचेबल आहेत असंही अनेकदा समोर आलं. पण तरीही दरवेळी अजित पवार पक्षात परतले आणि त्यांचं पक्षातलं स्थानही अबाधित राहिलं हे आतापर्यंत अनेकदा दिसलं आहे.
 
परंतु आता मात्र नजीकच्या काळात तरी असं होण्याची शक्यता कमी आहे, असं राजकीय विश्लेषक सांगतात. यामागे नेमकं काय कारण आहे? जाणून घेऊया,
 
शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकत्र येण्याची शक्यता किती?
अजित पवार आणि त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ सहकाऱ्यांनी 2 जुलै रोजी युती सरकारमध्ये सामील होत मंत्रिपदाची शपथ घेतली.
 
यानंतर शरद पवार यांची अनेक वक्तव्य समोर आली, अजित पवार आणि शरद पवार यांच्यात भेटीगाठीही झाल्या, ज्यामुळे शरद पवार यांच्या भूमिकेबाबत संभ्रम निर्माण झाला होता.
 
परंतु अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीचा दाखला देत शरद पवार म्हणाले, “पुन्हा संधी द्यायची नसते.”
 
या वक्तव्याच्या दुसऱ्याच दिवशी अजित पवार यांनी बंडानंतर पहिल्यांदाच पवारांचा बालेकिल्ला बरामतीत सभा घेतली. यामुळे आता अजित पवार यांचे परतीचे मार्ग बंद झाले आहेत का? असा प्रश्न विचारला जात आहे.
2019 च्या विधानसभा निवडणुकीवेळी अजित पवार यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यावेळीही राष्ट्रवादी काँग्रेस फुटली असं चित्र निर्माण झालं होतं. परंतु काही तासातच अजित पवार परतले आणि पक्षाकडूनही त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही.
 
शिवाय, अजित पवार यांच्या नाराजीच्या बातम्याही यापूर्वी अनेकदा आल्या. ते नॉट रिचेबल झाल्याचंही अनेकदा समोर आलं. परंतु अशा कित्येक घटना घडल्या असल्या तरी अजित पवार पुन्हा शरद पवार यांच्यासोबत येतात आणि पक्षातलं त्यांचं स्थानही अबाधित राहतं हे आतापर्यंत दिसलं आहे.
 
यामुळे यावेळीही पुन्हा असंच काही होईल आणि दोघं एकत्र येतील अशी आशा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आणि राजकीय वर्तुळात आजही जाते.
 
परंतु यावेळी मात्र शरद पवार यांनी पुन्हा संधी द्यायची नसते असं स्पष्टचं म्हटलं.
 
बीबीसी मराठीचे प्रतिनिधी मयुरेश कोण्णूर यांच्या प्रश्नाला उत्तर देताना शरद पवार म्हणाले, “पहाटेचा शपथविधी झाला होता. त्यात आमचे एक सहकारी सहभागी होते. त्यावेळी चर्चेनंतर म्हणाले आमच्याकडून योग्य झालं नाही. योग्य काम झालं नाही. पुन्हा त्या रस्त्याने जायचं नाही, अशी भूमिका घेतल्यानंतर एक संधी द्यावी म्हणून त्यावेळी निर्णय घेतला होता. पण संधी सारखी मागायची नसते आणि द्यायचीही नसते.”
तरीही शरद पवार यांच्या वक्तव्याचा नेमका अर्थ हा जसाच तसा घ्यायचा? की येत्या काळात पुन्हा काही राजकीय परिस्थिती बदलू शकते? हे प्रश्न मात्र कायम राहतात.
 
25 ऑगस्ट रोजी बारामती मध्ये सकाळी शरद पवारांनी पत्रकारांसमोर असं विधान केल्यानंतर वास्तविक संध्याकाळी त्यांची कोल्हापूर मध्ये सभा होतीच. त्या सभेत ते या विषयाबद्दल बोलून स्पष्टीकरण देऊ शकले असते. पण ‘अजित पवार आमचे नेते‘ अशा विधानामुळे अवघ्या काही तासांमध्ये जो संदेश माध्यमांमधून आणि समाज माध्यमांतून गेला, तो मित्र पक्षांसोबतच त्यांच्या स्वतःच्या पक्षातल्या कार्यकर्ते आणि नेत्यांनाही रुचला नाही असं एकंदरीत चित्र दिसलं, असं मयुरेश कोण्णूर सांगतात.
 
ते पुढे सांगतात, “दहिवडीच्या त्यांच्या कार्यकर्त्या मेळाव्यामध्ये उत्साह असला तरीही याबद्दल चर्चा सुरू होती. समजलेल्या माहितीनुसार, काही वरिष्ठ नेत्यांनी ज्यांची नाराजी लपली नाही, त्यांनी हा संदेश पवारांपर्यंत पोहोचवला. त्यामुळे ठरलेली नसताना त्यांनी दहिवडी मध्ये पत्रकार परिषद घेऊन अवघ्या तासातच याबद्दल स्पष्टीकरण द्यायचं ठरवलं असावं.
 
आपण स्वतः असं विधान केलं नाही, फक्त सुप्रिया सुळे जे म्हणाल्या त्याबद्दल विचारल्यावर प्रतिक्रिया देत होतो असं त्यांनी म्हटलं. पण कदाचित तेवढं उत्तर पुरेसं ठरणार नाही याची कल्पना असल्यामुळे शरद पवारांनी पुढे जाऊन ते आजवर जे बोलले नाही आहेत ते पवार म्हणाले. त्यांनी स्पष्टपणे हे सांगितलं की अजित पवारांना एक चूक दुरुस्त करण्याची संधी देता येऊ शकते पण दुसऱ्यांदा ती देता येत नाही.”
 
“त्यांच्या या विधानानंतर तिथं असलेले कार्यकर्ते आणि नेते यांना आता कोणतीही संधीग्धता राहिली नाही असं वाटलं. त्यातल्या काहींनी हे बोलूनही दाखवलं. या दौऱ्यात राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांशी बोलताना विशेषतः तरुण कार्यकर्त्यांशी बोलताना हे जाणवत होतं की ते शरद पवारांसोबत आहेत कारण त्यांना वाटतं आहे की पवारांची भाजपविरोधी भूमिका कायम राहील. पण याचाच अर्थ असाही होतो की, अजित पवारांपेक्षा भाजपविरोध हाच शरद पवारांना पाठिंबा मिळण्यासाठीचा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि म्हणूनच पवार भाजपालाच आपलं सतत लक्ष्य करत आहेत.”
 
राज्यात सध्या राजकीय घडामोडी वेगाने सुरू आहेत. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असं राजकारण रंगलेलं असताना राज्यभरात युती आणि मविआच्या नेत्यांच्या सभा सुरू आहेत.
 
येत्या काही दिवसांत राष्ट्रीय विरोधी पक्षांचीही (INDIA) बैठक मुंबईत होणार आहे. यासाठी शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वात पूर्व तयारी सुरू आहे.
 
एकाबाजूला शरद पवार यांच्या सभा सुरू आहेत तर दुसरीकडे उद्धव ठाकरेही पक्षबांधणीसाठी पुन्हा मैदानात उतरले आहेत. अशा राजकीय वातावरणात शरद पवार यांच्याबाबत गेल्या काही दिवसांपासून संभ्रम होता आणि त्यादृष्टीने विधानं केली जात होती.
 
परंतु आता शरद पवार आणि अजित पवार लोकसभा निवडणुकीच्या निकाल लागेपर्यंत तरी एकत्र येत नाहीत असं मत राजकीय विश्लेषक विजय चोरमारे यांनी मांडलं आहे.
 
शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं राजकारण जवळून पाहिलेले चोरमारे सांगतात, “मला वाटतं शरद पवार यांचं हे वक्तव्य वारंवार निर्माण होणारा संभ्रम दूर करण्यासाठी त्यांनी केलेलं आहे. कारण संभ्रमामुळे शरद पवार यांच्यासोबत असलेल्या नेत्यांमध्ये, कार्यकर्त्यांमध्येही संभ्रम निर्माण होत होता. पुन्हा अजित पवार येणार, पुन्हा त्यांचं वर्चस्व असणार आणि त्याला छेद द्यायचा असंही कार्यकर्त्यांना, नेत्यांना वाटू शकतं म्हणून त्यांच्यातील विश्वास वाढवण्यासाठी केलेलं हे वक्तव्य आहे.”
 
शरद पवार आता भाजपसोबत जातील असं वाटत नाही असंही विजय चोरमारे यांना वाटतं.
 
ते म्हणाले, “गेल्या काही दिवसांत त्यांना आग्रह करण्यात आला, दबावही होता. यामुळे एव्हाना त्यांनी निर्णय घेतला असता. किंवा पक्षात फूट पडण्यापेक्षा सर्वच गेले असते. परंतु तसंही घडलं नाही. तर दुसरीकडे अजित पवार आता मागे फिरतील असंही वाटत नाही. यामुळे नजीकच्या काळात म्हणजे लोकसभा निवडणूक होईपर्यंत तरी अजित पवार परत फिरतील किंवा यात काही बदल होईल असं मला वाटत नाही.”
 
“या वक्तव्याचा असाही अर्थ नाही की ते म्हटले आहेत तसंच होईल. मला वाटतं लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतरच हे स्पष्ट होऊ शकेल की अजित पवार काय भूमिका घेतात. ही शक्यता पूर्णत: लोकसभा निवडणुकीच्या निकालावर अवलंबून आहे,” असंही चोरमारे यांनी स्पष्ट केलं.
 
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार आमचेच नेते असून पक्षात कुठेही फूट पडलेली नाही असं वक्तव्य केलं होतं. परंतु शरद पवार यांनी भूमिका स्पष्ट केल्याने आता अशी वक्तव्य पुन्हा केली जाणार नाहीत कारण सर्वच नेत्यांना योग्य संदेश पोहचला आहे असंही पक्षातले नेते सांगतात.
 
बारामती मतदारसंघ – शेवटचा घाव ठरू शकतो?
पवार कुटुंबियांचा बालेकिल्ला असलेल्या बारामती मतदारसंघात नुकतीच अजित पवार यांची सभा झाली.
 
शरद पवार यांच्यापासून फारकत घेतल्यानंतर अजित पवार यांची आपल्या बारामती मतदारसंघात ही पहिलीच सभा होती. त्यांनी बारामतीत जीपमधून मिरवणूक काढत मोठं शक्तीप्रदर्शन यावेळी केलं.
 
यावेळी अजित पवार शरद पवार यांच्याविषयी काय भाष्य करतात याची उत्सुकता सर्वांना होती. विशेषत: पुन्हा संधी मिळणार नाही हे पवारांनी स्पष्ट केल्यानंतर आता अजित पवार यावर काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचं लक्ष होतं. परंतु अजित पवार यांनी यावर काहीही बोलायचं टाळलं.
 
भाजपचं लक्ष्य बारामती लोकसभा मतदारसंघ आहे हे काही लपून राहिलेलं नाही. पवारांचा बालेकिल्ला भाजपला काबीज करायचा आहे अशा आशयाची वक्तव्य सुद्धा गेल्या काही काळात भाजप नेत्यांनी केली आहेत.
 
सप्टेंबर 2022 मध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बारामती दौरा केला. त्यावेळी भाजपचे माजी मंत्री राम शिंदे यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं होतं, "2019 च्या निवडणुकांमध्ये अमेठीमधील गांधी कुटुंबाची मक्तेदारी राहुल गांधींच्या पराभवाने संपुष्टात आली. जर आम्ही हे अमेठीत करु शकतो तर हे बारामतीमध्येही आम्ही करु शकतो."
 
बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे आहेत. 2009 पासून बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे खासदार म्हणून निवडून येत आहेत. त्याआधी शरद पवारांनी बारामतीचं लोकसभेत प्रतिनिधित्व केलं.
 
बारामती लोकसभा मतदारसंघात दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर, भोर आणि खडकवासला हे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. यातल्या दोनमध्ये राष्ट्रवादीचे, दोन मतदारसंघांमध्ये काँग्रेसचे तर दोन मतदारसंघामध्ये भाजपचे आमदार आहेत.
 
यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांच्याविरोधात अजित पवार उमेदवार देणार का किंवा युतीच्या उमेदवारासाठी अजित पवार प्रचार करणार का? हे प्रश्न स्वाभाविक आहेत.
 
ज्येष्ठ पत्रकार प्रताप आसबे सांगतात, “अजित पवार आता शरद पवार यांच्यासोबत येतील असं वाटत नाही. पण परत समजा गेले तरी शरद पवार त्यांना नाही म्हणणार नाही असंही मला वाटतं. पण पूर्वीसारखी संधी देणार नाहीत असा त्यांच्या वक्तव्याचा अर्थ आहे. एकाबाजूने जवळपास ते तुटलेलंच आहे असं मला वाटतं.”
 
अजित पवार यांच्या बारामतीतील सभेबाबत बोलताना ते म्हणाले, “अजित पवार यांची बारामतीमधील रॅली अपेक्षेपेक्षा मोठी झाली. त्यांनी एकदाही शरद पवार यांचा उल्लेख केला नाही. परंतु मोदींवर मात्र ते बोलले. यामुळे पुन्हा एकत्र येण्याबाबत मला वाटतं की यावेळेला लढ्याला तोंड फुटलं आहे. बारामती मतदारसंघ पूर्ण यावर अवलंबून आहे. त्यामुळे बारमतीची लढाई येत्या काळात अधिक टोकदार होत जाईल.”
 
असं असलं तरी शरद पवार आणि अजित पवार यांचं कौटुंबिक नातं आहे, यामुळे हे दोन्ही नेते पुन्हा एकत्र येण्याची शक्यताही नाकारता येत नाही. यासंदर्भात बोलताना प्रताब आसबे सांगतात, “मला वाटत नाही की यावेळेला समेट होईल. कौटुंबिक नातं घट्ट आहे परंतु राजकीय निर्णयात कोणीही माघार घेईल असं वाटत नाही.”
 
महत्त्वाचं म्हणजे लोकसभा निवडणुकीदरम्यान सुप्रिया सुळे यांच्याविरोधात अजित पवार प्रचार करणार का? आणि अजित पवार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात प्रचार केल्यास, हे प्रकरण अधिक चिघळण्याची शक्यताही आहे असंही आसबे यांना वाटतं.
 
ते असंही सांगतात की, “समजा बारामतीत अजित पवार यांनी नमतं घेतलं तर परिस्थिती निवळेल सुद्धा. ही एक शक्यता आहे. पण आताच्या परिस्थितीत अजित पवार असं करतील का हे सांगता येत नाही. परंतु त्यांनी ठरवलं तर मार्ग निघू शकतो.” आणि म्हणूनच बारामती मतदारसंघ हा शेवटचा घाव ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
 
‘पक्षात फूट नाही,’ अशी वक्तव्य का केली जात आहेत?
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुठलीही फूट पडलेली नाही अशीही वक्तव्य खासदार सुप्रिया सुळे, शरद पवार यांनी केली आहेत.
 
अजित पवार यांच्यासह 9 मंत्र्यांवर कारवाई करावी अशा मागणीचं पत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी निवडणूक आयोगाला पाठवलं आहे. या 9 जणांवर कारवाई व्हावी अशी मागणी या पत्रात केली आहे.
 
तर अजित पवार यांना साथ दिलेल्या अनेक पदाधिकाऱ्यांवर आतापर्यंत पक्षाकडून कारवाई करण्यात आली आहे. असं असलं तरी पक्षात मात्र कोणतीही फूट नाही, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
 
याविषयी बोलताना विजय चोरमारे सांगतात, “राष्ट्रवादी काँग्रेस हा राष्ट्रीय पातळीवरील पक्ष आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कार्यकारिणीत देशभरातले प्रतिनिधी आहेत. उरलेली राष्ट्रीय कार्यकारिणी एकसंध आहे तेव्हा फूट पडली असं कसं म्हणायचं? तसंच याची कायदेशीर लढाई सुरू आहे. यादरम्यान विधानसभेत फ्लोअरवर कुठेही हे सिद्ध झालेलं नाही की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आहे. शिवाय, निवडणूक जवळ येईल तसं काही आमदार पुन्हा येऊ शकतील असा त्यांना विश्वास असावा.”
 
“तसंच शरद पवार आणि अजित पवार दोन्ही नेत्यांकडून एकंदरीत सर्वकाही गुलदस्त्यात ठेवायचं अशी मानसिकता असल्याचं दिसून येतं. शरद पवार सुद्धा मुत्सद्दी भूमिका मांडतात. यामुळे कायदेशीरदृष्ट्या पुढे काय होतं हे पहाणं महत्त्वाचं ठरेल. दोन गट असले तरी प्रत्यक्षात निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालय आणि अध्यक्षांचा याबाबत काहीही निर्णय आलेला नाही,”
 








Published By- Priya DIxit