विरोधी पक्षनेते अजित पवार गुरुवारपासून या जिल्हयांना देणार भेटी
विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे गुरुवारपासून ( दि.२८ जुलै ) विदर्भ, मराठवाड्यासह राज्यातील अतिवृष्टी व पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर जात असून आपल्या दौऱ्यात ते स्थानिक नागरिक, लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांकडून अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती घेणार आहेत.
अजित पवार हे गुरुवारी,२८ जुलैला गडचिरोली, चंद्रपूर व नागपूर जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाला भेट देतील. शुक्रवारी, २९ जुलैला ते वर्धा, यवतमाळ जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागांना भेट देणार आहेत. शनिवारी, ३० जुलैला नांदेड, परभणी, हिंगोली व बीड जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाला भेट देणार आहेत.
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतजमिनीचे आणि पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून ११० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची तसेच अतिवृष्टीग्रस्त नागरिकांना दिलासा देण्यासाठी विधीमंडळाचे अधिवेशन त्वरीत बोलावण्याची मागणी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे पत्र लिहून केली आहे.