शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 14 नोव्हेंबर 2021 (14:21 IST)

महाराष्ट्रअमरावती हिंसाचार: 'हिंदू मार नही खाएगा' अशी स्वाभाविक प्रतिक्रिया - चंद्रकांत पाटील

अमरावतीमध्ये उसळलेल्या हिंसाचारावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया देताना महाविकास आघाडी सरकारवर बोटचेपेपणाचा आरोप केला आहे.
 
"1993 साली मुंबईत घडलेल्या दंगलीमध्ये हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी बोटचेपी भूमिका घेतली नाही म्हणूनच मुंबईतील हिंदू जिवंत राहिला. परवा त्रिपुरातील कथित घटनेवरून घडलेल्या घटनांवर बाळासाहेबांचे वारसदार कुठलीही ठोस भूमिका घेत नाहीत हे धक्कादायक आहे," असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अमरावतीतील हिंसाचारावर बोलताना ती 'हिंदू मार नही खाएगा' अशी अमरावतीतील स्वाभाविक प्रतिक्रिया असल्याचं वक्तव्य केलंय. तसेच खऱ्याला खरं म्हणायला आम्हाला कधीच भिती वाटत नाही, असंही ते म्हणाले. त्यांनी अमरावतीत रस्त्यावर उतरलेल्या 15-20 हजार जनसमुहावरही आक्षेप नोंदवला.
 
आपण चिथावणी देत नाहीत तर वस्तूस्थिती सांगत आहोत असं देखील ते म्हणाले.
 
शुक्रवारी झालेल्या तोडफोडीच्या निषेधार्थ अमरावतीत आज भाजप आणि हिंदुत्ववादी संघटनेकडून अमरावती बंद पुकारण्यात आला. या दरम्यान शहरात तणावाचं वातावरण निर्माण झालं. काही ठिकाणी तोडफोडीच्या घटनाही घडल्या.
 
जिल्हा प्रशासनानं खबरदारीचा उपाय म्हणून पुढील आदेशापर्यंत अमरावती शहरात संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
 
अमरावतीत आज भाजप आणि हिंदुत्ववादी संघटनेकडून अमरावती बंद पुकारण्यात आला. सकाळी भाजपचे कार्यकर्ते राजकमल चौकात जमले आणि मोर्चा काढला.
 
त्रिपुरात घडलेल्या घटनेनंतर काल विशिष्ट समुदायाकडून अमरावती शहरात झालेल्या तोडफोड करण्यात आली होती.
 
दरम्यान, भाजप व हिंदुत्ववादी संघटनांकडून  पाकिस्तान विरोधी घोषणाबाजी केल्या. बंदच्या अनुषंगाने अमरावती शहरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
बंदमुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी आंदोलकांनी काही दुकानांची तोडफोड केली असून बंदला हिंसक वळण लागले आहे. काही ठिकाणी दगडफेकही करण्यात आली आहे.
 
दरम्यान, राज्य सरकार पूर्णपणे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. संयम बाळगावा असं आवाहन गृहमंत्र्यांनी केलं आहे.
 
या प्रकरणामध्ये जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. या परिस्थितीत आपण सगळ्यांनी सामाजिक ऐक्य राखणे आवश्यक आहे आणि त्या दृष्टीकोनातून सगळ्यांनी सहकार्य करावे, अशी विनंतीही त्यांनी जनतेला केली आहे.
 
पोलिसांनी परिस्थिती संयमाने हाताळण्याचे आणि राज्यामध्ये शांतता कशी राहील यादृष्टीने कार्यरत राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वत्र कठोर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
 
दरम्यान पक्ष कोणताही असो शांतता ठेवावी अस आवाहन खासदार नवनीत राणा यांनी केलं आहे.
 
दंगली घडवण्याचा कट-संजय राऊत
"भाजप धार्मिक द्वेष, तेढ पसरवल्याशिवाय राजकारण करू शकत नाही. भाजपचीच अंतर्गत संघटना आहे. दंगली घडवल्या जात असतील तर गृह मंत्रालय सक्षम आहे. हे सगळं नियोजनबद्ध आहे. राज्याला अस्थिर करण्याचं कारस्थान. ईडी, सीबीआय यांच्या माध्यमातून ओरखडाही उमटत नाही. म्हणून दंगली घडवायच्या असा कट आहे", असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
 
ते पुढे म्हणाले, "मराठवाड्यात, नांदेडला हे प्रकार घडत आहेत. विरोधी पक्षाने महाराष्ट्राला चूड लावण्याचा प्रकार करू नये. महाराष्ट्राला वेगळी परंपरा आणि प्रतिष्ठा आहे. तुम्ही महाराष्ट्राचे सगळ्यात मोठे शत्रू आहेत. दंगलखोरांचा बुरखा फाडला जाईल. खरे दंगलखोर वेगळेच आहेत. दंगलखोरांना पकडून कठोर कारवाई केली जाईल. विरोधी पक्षाला सांगणं आहे की मांजर डोळे मिटून पाहत असलं तरी जग पाहत असतं. रझा अकादमी वगैरे झूठ आहे, या मागे वेगळी माणसं आहेत. त्यांची तेवढी ताकद नाही".
 
हिंसक आंदोलन करू नये- नवाब मलिक
"जे काल घडले ते योग्य नाही, ज्यांनी नियमभंग केलाय त्यांच्यावर कारवाई होणारच, आंदोलन करणे हा तुमचा अधिकार आहे, पण हिंसक आंदोलन करू नये. नियोजित पद्धतीने देशाचे वातावरण कसे बिघडेल हे वसीम रिझवी करत आहेत", असं राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि मंत्री नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.
 
"यापुढे हिंसा होणार नाही याची दक्षता लोकांनी घेतली पाहिजे, ही शांती भंग करण्यासाठी काही लोक प्रयत्न करत आहेत, कोण काय मागणी करेल हा त्यांचा प्रश्न आहे, पण योग्य ती सरकार कारवाई करेल", असं मलिक म्हणाले.
 
त्रिपुरा प्रकरणाचे पडसाद
त्रिपुरात मुस्लीम समाजावर होत असलेल्या कथित अत्याचाराविरोधात शुक्रवारी काढलेल्या रॅलीला राज्यात काही ठिकाणी हिंसक वळण लागलं होतं.
मालेगाव, नांदेड आणि अमरावती अशा ठिकाणी तणाव निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं होतं.
 
मालेगावमध्ये त्रिपुरातील हिंसाचाराच्या विरोधात बंदची हाक देण्यात आली होती. दुपारपर्यंत बंद शांततेमध्ये सुरू होता. मात्र त्यानंतर त्याला हिंसक वळण लागत दगडफेक करण्यात आली. तर पोलिसांना परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी लाठीमार करावा लागला.
 
दुसरीकडे नांदेडमध्ये काही लोकांनी केलेल्या दगडफेकीमुळं शहरात तणावाचं वातावरण निर्माण झालं. या दगडफेकीत पोलीस अधिकारीदेखील जखमी झाले आहेत.
 
त्याशिवाय अमरावतीमध्येही या घटनेचे पडसाद उमटल्याचं पाहायला मिळालं आहे. काही ठिकाणी तोडफोड करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. शहरातील विविध भागांमध्ये 20 ते 22 दुकानांची तोडफोड झाल्याची माहिती मिळाली आहे. आंदोलकांनी अनेक भागांमध्ये दगडफेकही केली.
 
मालेगावमध्ये रझा अकादमीसह इतर मुस्लीम संघटनांकडून बंदची हाक देण्यात आली होती. त्रिपुरातील दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी पुकारण्यात आलेला बंद दुपारपर्यंत शांतपणे सुरू होता.
अमरावती शहरामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर एका मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. या मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येत आंदोलक सहभागी झाले होते. मात्र या मोर्चाला हिंसक वळण लागल्यानं शहरात तणाव निर्माण झाला.
 
मात्र काही लोकांनी मोर्चा काढत काही परिसरातील व्यापारी संकुलात सुरू असलेली दुकानं बंद करण्यासाठी दगडफेक केली. त्यानंतर परिस्थिती चिघळली. शीघ्र कृती दलाच्या जवानांसह त्यांच्या वाहनांवरही जमावातर्फे दगडफेक करण्यात आली. त्यामुळं पोलिसांना लाठीमार करावा लागला, असं पोलिसांचं म्हणणं आहे.
नांदेडमध्येही त्रिपुरा येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर दुपारी अडीच वाजेनंतर शहरातील काही भागांमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं.
 
प्रामुख्यानं शहरातील शहरातील नई आबादी, शिवाजीनगर आणि देगलूर नाका परिसरात जमावानं दगडफेक करत तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
 
त्रिपुरामध्ये काय घडलं?
 
देशाच्या ईशान्येला असलेल्या त्रिपुरामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये धार्मिक तणावाचं वातावरण निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. बांगलादेशात घडलेल्या हिंसाचाराच्या प्रकाराची प्रतिक्रिया म्हणून याकडं पाहिलं जात आहे.
 
बांगलादेशातील घटनेनंतर याठिकाणी विश्व हिंदू परिषद आणि जमात-ए-उलेमा (हिंद) अशा धार्मिक संघटना आमने सामने आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
 
त्रिपुरा हे राज्य बांगलादेशला अगदी लागून असल्यामुळं याठिकाणी हा तणाव पसरल्याचं सांगितलं जात आहे. याठिकाणी विविध गटांकडून एकमेकांच्या विरोधात हिंसाचाराच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत.
 
या हिंसाचारामध्ये अनेक खासगी तसंच सार्वजनिक मालमत्तांचंही नुकसान झाल्याचं पाहायला मिळत आहे. पोलीस यूएपीए कायद्यांतर्गत कारवाई करत असल्यानं, त्यावरूनही रोष असल्याचं पाहायला मिळत आहे.
 
पोलिसांनी खोटे फोटो, व्हीडिओ किंवा आक्षेपार्ह माहिती पसरवून त्या माध्यमातून धार्मिक तणाव वाढण्याचा धोका असल्यानं, कारवाई केल्याचं म्हटलं आहे. तर यूएपीएच्या माध्यमातून ठरावीक गटाला लक्ष्य करून कारवाई केली जात असल्याचा आरोप, याला विरोध करणाऱ्यांनी केला आहे.