बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

सरकारकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान – धनंजय मुंढे

युगपुरूष छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक या राज्यात होणार होते. आज त्याच्या कामाला न्यायालयाने बंदी घातली आहे. कारण त्या संबंधीच्या परवानग्याच सरकारने घेतलेल्या नाहीत. मग जर परवानगीच नव्हती तर देशाचे पंतप्रधान या स्मारकाचे जलपूजन करतातच कसे? हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे. या स्मारकाच्या समितीचे प्रमुख विनायक मेटेही येथे आहेत. त्यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिले होते. त्यात त्यांनी या स्मारकाचे कंत्राट कशा चुकीच्या प्रकारे दिले आहे, हे सांगितलेले आहे. हे सरकार परवानग्या घेत नाही, स्मारकाची उंची कमी करते. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे, असे वक्तव्य विधान परिषदेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले.
 
शेतकऱ्यांच्या खात्यावर २ हजार रूपये जमा होणार होते, शेतकऱ्यांना मदत करणार अशी घोषणा केंद्र सरकारने केली होती. केंद्रिय अर्थसंकल्पात मोठा गाजावाजा करून ६ हजार वर्षाला देणार अशी घोषणा केली गेली. पण शेतकऱ्यांना २ हजार रुपये देऊन लगेच परत घेतल्याचे धक्कादायक प्रकार घडत आहेत. शेतकऱ्यांची अशी फसवणूक आजपर्यंत कधीच झाली नाही, असे वक्तव्य मुंडे यांनी सभागृहात केले.
 
जर मदत करायची नसेल तर करू नका पण शेतकऱ्यांचा असा अपमान करू नका...आज दुष्काळ पडलेला असताना शेतकऱ्यांना ही तोकडी मदत करून शेतकऱ्यांचा अपमान केला जात आहे, म्हणून आज सगळी चर्चा बाजूला ठेवून या विषयावर सभागृहात चर्चा करावी, अशी मागणी मुंडे यांनी केली.