बेटिंग प्रकरणात मामा-भाच्याचा हात ; भाच्यानंतर मामालाही अटक
हॉर्स बेटींगनंतर पुणे पोलिसांनी उघड केलेल्या क्रिकेट बेटींगमध्ये एका मामा-भाच्याचा हात असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे भाचानंतर आता पोलिसांनी त्याचा मामाला देखील अटक केली आहे. सुनील राजकुमार माखिजा (वय ४२, रा. कोंढवा) असे या मामाचे नाव आहे.
आयपीएल, बिग बॅश लिग, भारत – ऑस्ट्रेलिया टी-२० सामने, एकदिवसीय व कसोटी सामने तसेच सध्या सुरू असलेल्या भारत-इंग्लंड कसोटीच्या कसोटीमध्ये नागरिकांकडून लाखो रुपये बेटींगसाठी उकळल्या प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. या गुन्ह्यात यापूर्वी लाईनबॉय अजय अनिल शिंदे (वय ३६, रा. हंस कॉटेज हाऊस, कल्याणीनगर व खडक पोलिस लाईन) आणि गौरव मनोज आहुजा (वय २०, रा. टिळक रोड) या दोघांना अटक करण्यात आली आहे. सुनील हा गौरव याचा मामा आहे.
तिघांवरही अडीच लाखांची खंडणी उकळण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विमाननगर येथील एका २३ वर्षीय व्यावसायिक तरुणाने याबाबत विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली नुकताच हॉर्स बेटींगमधील गैरप्रकार पुणे पोलिसांनी उघड केला होता. आता पोलिसांनी क्रिकेट बेटींगचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी सुनील या अटक करून न्यायालयात हजर केले. त्यावेळी त्याला पोलिस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकील नितीन कोंघे यांनी केली.
ओळखपरेड करण्यासाठी, तसेच गुन्ह्याचा मास्टर माईंड कोण आहे, याचा शोध घेण्यासाठी त्याला पोलिस कोठडी देण्याची मागणी कोंघे यांनी केली. त्यानुसार न्यायालयाने त्याला १६ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. आरोपींचा साथीदार सचिन निवृत्ती पोटे हा फरार झाला आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.