मिरजेत मूर्ती विटंबना, तणावाची स्थिती; मनोरूग्ण महिला ताब्यात
सांगली : मिरज शहरातील लक्ष्मी मार्केट परिसरातील हनुमान मंदिरामध्ये मुर्तीची विटंबना केल्याची घटना उघडकीस आली असून या प्रकरणी पोलीसांनी संशयित मनोरूग्ण महिलेला ताब्यात घेतले आहे. दरम्यान, या प्रकारामुळे शहरातील दुकाने आज दुपारपासून बंद ठेवण्यात आली असून पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आला आहे.
लक्ष्मी मार्केटमध्ये महापालिकेच्या अग्निशमन कार्यालयाच्यामागे पूरातन हनुमान मंदिर असून या मंदिरातील मुर्तीची विटंबना केल्याचा प्रकार काही लोकांच्या नजरेस आला. ही माहिती तात्काळ शहरात पसरल्यानंतर हिंदूत्ववादी कार्यकर्ते एकत्र आले. जय श्रीरामच्या घोषणा देत लक्ष्मी मार्केट परिसरात फेरी मारली. यामुळे शहरातील मुख्य बाजारपेठेतील दुकाने दुपारपासून बंद करण्यात आली. उपहारगृहे, चहा गाडे, ईदनिमित्त पदपथावर विक्रीसाठी बसलेले विक्रेते, भाजीपाला विके्रते यांनी आपले व्यवसाय बंद ठेवले.
शहरात अनुचित प्रकार घडू नये यासाठी तात्काळ मिरज शहरसह, महात्मा गांधी चौक, औद्योगिक वसाहत, सांगली ग्रामीण, विश्रामबाग, सांगली शहर, मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यासह मुख्यालयातील अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. दरम्यानच्या काळात पोलीसांनी या घटनेची सीसीटीव्हीच्या माध्यमातून तपास केला असता सदरचे कृत्य एका महिलेने केल्याचे समोर आले असून त्याच्या आधारे महिलेला तात्काळ ताब्यात घेण्यात आले.