शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: नाशिक , सोमवार, 5 जुलै 2021 (22:22 IST)

नाशिक महापालिकेच्या शहर बससेवेला ८ जुलैचा मुहूर्त !

नाशिक महापालिकेच्या बहुप्रतिक्षित शहर बससेवेला अखेर मुहूर्त मिळाला असून, येत्या ८ जुलै रोजी राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते या बस सेवेचे उद्घाटन करण्यात येणार आहे.
 
महापौर सतीश कुलकर्णी, तसेच भाजप पदाधिकार्‍यांनी मुंबईत फडणवीस यांची भेट घेत त्यांना कार्यक्रमाचे निमंत्रण दिले. यावेळी भाजप प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब सानप, भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे, प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, आमदार राहूल ढिकले, स्थायी समिती सभापती गणेश गीते, भाजपचे ज्येष्ठ नेते विजय साने आदींनी फडणवीस यांची भेट घेत निमंत्रण दिले. महापालिकेने २०१८ मध्ये शहर बस वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर कंपनीने काम सुरू केले, मात्र अनेक अडचणींमुळे बससेवेला मुहूर्त मिळू शकला नाही. गेल्यावर्षी २६ जानेवारी रोजी महापालिकेने बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला असला तरी, शासनाकडून बस संचलनाचा परवानाच मिळाला नसल्याने ही सेवा सुरू होऊ शकली नाही. त्यानंतर परवाना मिळाला आणि कंपनीच्या बसेसदेखील मार्च महिन्यात दाखल झाल्या.
 
दरम्यान, कोरोनाच्या संकटामुळे बससेवा सुरु होऊ शकली नाही. अखेर आता सर्व परवानग्या पूर्ण झाल्या असून परिवहन विभागाने तिकिट दरही निश्चित केले आहे. शहरातील ९ मार्गांवर या बसेस धावणार असून सुरूवातीला ५० बसेस धावणार आहेत. टप्प्याटप्प्याने २५० बसेस सुरू करण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले. या कार्यक्रमासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मंत्री गिरीश महाजन, नाशिकचे प्रभारी जयकुमार रावल, पालकमंत्री छगन भुजबळ यांनाही निमंत्रण देण्यात आल्याचे महापौर कुलकर्णी यांनी सांगितले.
 
डिझेल व सीएनजी बस धावणार
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१७ मध्ये बससेवा महापालिकेने चालविणे बंधनकारक असल्याच्या सूचना दिल्यानंतर सत्ताधारी भाजपने शहर बससेवेसाठी हालचाली गतिमान केल्या. सप्टेंबर २०१८ मध्ये ग्रॉस कॉस्ट कटिंग तत्त्वावर बससेवा सुरू करण्याचा ठराव महासभेत केला. त्यानंतर मे. ट्रॅव्हल टाइम कार रेन्टल प्रा. लि. पुणे व मे. सिटी लाइफलाइन ट्रॅव्हल्स प्रा. लि. दिल्ली या ऑपरेटर्सची नेमणूक केली. फेब्रुवारी २०२१ शासनाने परवानगी दिली. प्रादेशिक परिवहन प्राधिकरण तथा जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय समितीसमोर १४६ विविध मार्गांवर टप्पा वाहतुकीला परवानगी मिळण्याबरोबरच टप्पा दर मंजुरीचा प्रस्ताव सादर करण्यात आला. त्यानूसार ट्रायल रन घेण्यात येउन तिकिट दरही निश्चित करण्यात आले आहेत.
 
नाशिक शहरातील बसचे मार्ग :
– तपोवन तर बारदान फाटामार्गे सीबीएस, सिव्हिल हॉस्पिटल, सातपूर, अशोकनगर
– तपोवन ते सिम्बॉयसिस कॉलेज मार्गे, सीबीएस, सिव्हिल, पवननगर, उत्तमनगर
– तपोवन ते पाथर्डी गावमार्गे द्वारका, नागजी, इंदिरानगर, वनवैभव
– सिम्बायोसिस कॉलेज ते बोरगड मार्गे शिवाजी चौक, लेखानगर, महामार्ग, म्हसरुळ
– तपोवन ते भगूरमार्गे द्वारका, बिटको, देवळाली कॅम्प