रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 8 ऑगस्ट 2023 (21:04 IST)

मुंबई : मेक्सिकोतील राज्य महाराष्ट्राशी व्यापार, शैक्षणिक सहकार्य वाढविण्यास इच्छुक – सॅम्युएल आलेहान्द्रो

social media
social media
मेक्सिकोतील नवेवो लिआन राज्याचे गव्हर्नर सॅम्युएल आलेहान्द्रो गार्सिया सेपूलवेडा यांनी एका शिष्टमंडळासह राज्यपाल रमेश बैस यांची अलिकडेच राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली.
 
नवेवो लिआन हे मेक्सिकोतील सर्वाधिक गुंतवणूक-स्नेही प्रगत राज्य असून राज्याची सीमा अमेरिकेशी जोडली असल्याने ते अनेक देशांशी व्यापाराचे प्रवेशद्वार आहे, असे गव्हर्नर सॅम्युएल आलेहान्द्रो यांनी यावेळी सांगितले.
 
महाराष्ट्राचे व्यापार-उद्योगातील महत्त्व जाणून मेक्सिकोने मुंबईत आपला वाणिज्य दूतावास सुरु केला असून उद्योजक-व्यापाऱ्यांना मेक्सिकोत येण्यासाठी सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, असे त्यांनी सांगितले. नवेवो लिआन राज्यात चार खासगी विद्यापीठे असून आपले राज्य व्यापारासह महाराष्ट्रातील विद्यापीठांशी शैक्षणिक सहकार्य करण्यास इच्छुक आहे, असे त्यांनी राज्यपाल बैस यांना सांगितले.
 
इलेक्ट्रिक वाहनांची कंपनी असलेली टेस्ला, बीएमडब्ल्यू तसेच भारतातील टीसीएस व इन्फोसिसने या कंपन्यांनी आपल्या राज्यात गुंतवणूक केली असून आपल्या 200 औद्योगिक वसाहतींमध्ये आपण उद्योगांना सर्व सुविधा उपलब्ध करून देत असल्याचे त्यांनी सांगितले.
 
मेक्सिको आणि भारत पारतंत्र्यात होते, तेव्हापासून त्यांचे संबंध घनिष्ट असल्याचे नमूद करून नोबेल पुरस्कार विजेते ऑक्टेव्हिओ पाझ हे मेक्सिकोचे भारतातील राजदूत राहिले असल्याचे राज्यपालांनी यावेळी सांगितले. भारत यंदा जी -20 समूह देशांचा अध्यक्ष असून मेक्सिको त्यातील महत्त्वाचा देश असल्याचे सांगून नवेवो लिआन व महाराष्ट्रातील विद्यापीठांनी विद्यार्थी आदान – प्रदान  करार केल्यास, त्याचे आपण स्वागत करू, असे राज्यपालांनी सांगितले. बैठकीला नवेवो लिआन राज्याचे वित्त मंत्री इवान रिवास रोड्रिगेस तसेच मुंबईतील वाणिज्यदूत उपस्थित होते.

Edited By - Ratnadeep Ranshoor