बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 31 ऑक्टोबर 2022 (08:18 IST)

नाशिक विमानतळ तब्बल १३ दिवस राहणार बंद

nasik airport
नाशिक – ओझर येथील नाशिक विमानतळावरून सध्या प्रवासी विमानसेवा दिली जाते. स्पाईस जेट या कंपनीद्वारे नाशिक ते नवी दिल्ली आणि नाशिक ते हैदराबाद या दोन सेवा दिल्या जात आहेत. मात्र नाशिक विमानतळ तब्बल १३ दिवस सलग बंद राहणार आहे. या काळात कुठलीही विमानसेवा दिली जाणार नाही.
 
ओझर विमानतळाची मालकी असलेल्या हिंदुस्थान एरोनोटिक्स लिमिटेड (एचएएल) ने दिलेल्या माहितीनुसार, येत्या २० नोव्हेंबर ते ३ डिसेंबर या काळात म्हणजे सलग १३ दिवस विमानसेवा बंद राहणार आहे. या कालावधीमध्ये नाशिक विमानतळाच्या धावपट्टीच्या देखभाल आणि दुरुस्तीचे काम हाती घेतले जाणार आहे. दरवर्षी अशा प्रकारचे काम करण्यात येते. हवाई वाहतूक संचालनालयच्या निर्देशानुसार धावपट्टीची देखभाल, दुरुस्ती आणि मजबुती केली जाते. या कामामुळे कुठलेही विमान धावपट्टीवर उतरू किंवा उड्डाण घेऊ शकणार नाही. परिणामी नाशिक विमानतळावरून २० नोव्हेंबर ते ३ डिसेंबर या कालावधीत स्पाईस जेट या कंपनीची नवी दिल्ली आणि हैदराबाद ही सेवा बंद राहणार आहे. त्यानंतर म्हणजे ४ डिसेंबर पासून धावपट्टी नियमित उपलब्ध राहणार आहे.
 
Edited by: Ratnadeep Ranshoor