मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 12 ऑक्टोबर 2021 (08:18 IST)

नाशिक : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून करणाऱ्या पतीला जन्मठेप

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची निर्घृण हत्या करणाऱ्या पतीस जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या. व्ही. एस. कुलकर्णी यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. अण्णासाहेब निवृत्ती गायके (वय ५५, रा. अपर्णा कॉलनी, शिवरामनगर) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

गायके दांपत्यात चारित्र्याच्या संशयातून नेहमी वाद होत होते. १० जानेवारी २०१८ ला ज्योती गायके या स्वयंपाकघरात काम करीत असताना पती अण्णासाहेब व त्यांच्यात वाद झाले. यावेळी अण्णासाहेब याने किचनमध्ये पडलेली लोखंडी मुसळी पत्नी ज्योती यांच्या डोक्यात घालीत हत्या केली होती. यावेळी मुलगा अजिंक्य आणि त्याच्या बहिणीने आई- वडिलांमधील वाद मिटविण्याचा प्रयत्न केला असता, आरोपीने त्यांनाही लोखंडी मुसळीने मारहाण करीत जखमी केले होते. या प्रकरणी अजिंक्य गायके याच्या तक्रारीवरून वडील अण्णासाहेब गायके याच्याविरुद्ध उपनगर पोलिस ठाण्यात खून आणि ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
 
तत्कालीन निरीक्षक महेंद्र चव्हाण यांनी या गुह्याचा तपास करून पुराव्यानिशी दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले होते. हा खटला जिल्हा व सत्र न्यायालय क्रमांक १ चे न्या. व्ही. एस. कुलकर्णी यांच्यासमोर चालला. अ‍ॅड. सुलभा सांगळे यांनी सरकार पक्षातर्फे कामकाज पाहिले. फिर्यादी, पंच आणि साक्षीदार यांनी दिलेली साक्ष व परिस्थितीजन्य पुरावे ग्राह्य धरून न्या. कुलकर्णी यांनी आरोपीस खुनाच्या आरोपात जन्मठेप आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास सहा वर्ष सश्रम कारावास असेही आपल्या निकालात नमूद केले आहे.