शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 21 जुलै 2023 (08:51 IST)

नाशिक: ॲपल कंपनीचे पावणे पाच लाखांच्या बनावट ॲक्सेसरीज जप्त दुकानांवर छापेमारी

नाशिक: शहरातील महात्मा गांधी रोडवरील (एमजी रोड) मोबाईल ॲक्सेसरीज मार्केट मधील पाच दुकानांवर पोलिसांनी छापामारी करीत ॲपल कंपनीचे पावणे पाच लाखांच्या बनावट ॲक्सेसरीज जप्त केला.
याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात चौघांविरोधात कॉपीराईट ॲक्टअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
विपिन चिमणाजी पटेल (43, रा. उदय कॉलनी, पंचवटी), बाबुलम नेथिराम चौधरी (27, रा. उदय कॉलनी, पंचवटी), सुरेश भोपाजी देवास (22, रा. दीपज्योती अपार्टमेंट, मालेगाव स्टॅण्ड, पंचवटी), रमेश मगा प्रजापती (32, रा. मधुबन कॉलनी, मखमलाबाद नाका) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.
 
ॲपल कंपनीचे प्रतिनिधी कुंदन गुलाबराव बेलोशे (रा. विठ्ठलवाडी, पूर्व कल्याण, ठाणे) यांच्या फिर्यादीनुसार, एमजी रोड परिसरातील मोबाईल मार्केटमध्ये ॲपल कंपनीचे बनावट ॲक्सेसरीज विक्री केली जात होती.
 
त्यामुळे कंपनीच्या व्यवसायावर परिणाम होत होता. याबाबत खातरजमा केल्यानंतर शहर गुन्हेशाखा युनिट एकच्या पथकाने बुधवारी दुपारी दोन वाजता पाच दुकानांवर छापा टाकला.
यात ॲपल इंक कंपनीच्या बनावट ॲडाप्टर, युएसबी केबल, एअरपॉड, मोबाईल बॅककव्हर, ॲपल स्टीकर यासह साहित्य असे 4 लाख 63 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
 
याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात कंपनीच्या स्वामीत्व हक्काचे उल्लंघन केल्याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक सुरवाडे हे करीत आहेत.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor