शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 11 मार्च 2022 (15:25 IST)

नवाब मलिक यांच्या याचिकेवर आता मंगळवारी निर्णय होणार

कथित आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी कोठडीत असलेल्या अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांच्या याचिकेवर आता मंगळवारी निर्णय होणार आहे. मलिक यांनी आपली अटक ही बेकायदा असल्याचा दावा करत न्यायालयात याचिका दाखल केली होती. याच याचिकेवरील सुनावणी आज पूर्ण झाल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला आहे. मंगळवारी सकाळी १०.३० वाजता न्यायालय आपला निकाल देईल.
 
कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याच्या मालमत्तांशी संबंधित कथित आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी ईडीने अर्थात सक्तवसुली संचालनालयाने मलिक यांच्यावर अटकेची कारवाई केली होती. ही अटक बेकायदेशीर असल्याचा दावा करत मलिक यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज सुनावणी झाली. न्यायालयात मलिक यांची बाजू अॅड. अमित देसाई यांनी मांडली. तर ईडीकडून मलिक यांची अटक ही कायदेशीर असल्याचा दावा करण्यात आला. दोन्ही बाजूंचे युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला असून येत्या मंगळवारी निकाल जाहीर करणार आहे.