'नाणार' नाहीच, शिवसेनेचा विरोध कायम
'नाणार' प्रकल्पासंबंधीची शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'मध्ये प्रसिद्ध झालेली जाहिरात आणि शिवसेनेची प्रकल्पविरोधी भूमिका या दोन्ही भिन्न गोष्टी आहेत. प्रकल्प नकोच अशी शिवसेनेची भूमिका आहे, असे पक्षाचे खासदार विनायक राऊत यांनी स्पष्ट केले.
'सामना' या वृत्तपत्रात नाणार रिफायनरीची जाहिरात प्रसिद्ध झाल्याने प्रकल्प समर्थकांना एकप्रकारे बळ मिळाल्याचे बोलले जात होते. मात्र, सिंधुदुर्गचे शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी जाहिरातीसंबंधी स्पष्टीकरण दिले आहे. वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेली जाहिरात आणि शिवसेनेची प्रकल्पविरोधी भूमिका या दोन्ही गोष्टी भिन्न आहेत. प्रकल्प नकोच अशी शिवसेनेची भूमिका आहे, असे ते म्हणाले.
नाणार प्रकल्पाला शिवसेनेने तीव्र विरोध केला होता. विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोकण दौर्यावर असताना, त्यांनी रिफायनरी प्रकल्प होऊ शकतो, असे संकेत दिले होते. मात्र, निवडणुकीनंतर शिवसेनेच नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर नाणार प्रकल्प गुंडाळणार असे वातावरण तयार झाले होते. मात्र, शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिकात प्रकल्पासंबंधी जाहिरात प्रसिद्ध झाल्याने प्रकल्प समर्थकांना पुन्हा बळ मिळाल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे भाजपचे नेते नीतेश राणे यांनी प्रकल्पाबाबत शिवसेना घेत असलेल्या भूमिकेची खिल्ली उडवली. तर माजी आमदार प्रमोद जठार यांनी शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडले होते.