कुख्यात गँगस्टर इजाज लकडावालाला ठाणे खंडणी विरोधी पथकाकडून अटक
मुंबईतल्या कल्याण येथील व्यावसायिकाकडून दोन कोटींची खंडणी मागितल्या प्रकरणी छोटा राजन टोळीतील कुख्यात गँगस्टर इजाज लकडावाला याला ठाणे खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. लकडावाला याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी असे तीसहून अधिक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. ठाणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने त्यास तळोजा कारागृहातून चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
इजाज लकडावाला हा मुंबईतल्या नागपाडा भागात राहत असल्याने त्याचे अनेक गँगस्टर बरोबर संबंध होते. मात्र, दाऊद व छोटा राजन टोळीत वैमनस्य पेटल्यांतर इजाज छोटा राजन टोळीत सामील झाला होता. इजाजवर खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी असे गंभीर स्वरूपाचे २५ गुन्हे मुंबईत दाखल आहेत. तर ठाण्यात देखील त्याच्या विरोधात ५ ते ६ गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. इजाज याच्यावर मुंबई पोलिसांनी मोक्का कायद्या अंतर्गत कारवाई केल्यानंतर तो मुंबईतून फरार झाला होता.