मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 9 फेब्रुवारी 2022 (21:12 IST)

मुलीचा विनयभंग करणाऱ्याला वृद्धाला जन्मठेपची शिक्षा

पातूर तालुक्यातील सस्तीयेथील गजानन शिवाजी गवाई (६०) या वृद्धाने एका अल्पवयीन बालिकेचा विनयभंग केल्याप्रकरणी अतिरिक्त सह जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही.डी.पिंपळकर यांचे न्यायालयात आजीवन कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. ही घटना नोव्हेंबर २०१९ मध्ये चान्नी पोलिस स्टेशनंतर्गत घडली होती.
 
२८ नोव्हेंबर २०१९ रोजी पीडित अल्पवयीन मुलगी (वय ५ वर्षे) हिच्या आजीने पोलिस स्टेशन चान्नी येथे फिर्याद दिली की, तिची नात गजानन शिवाजी गवाई किराणा दुकानावर चॉकलेट आणण्याकरिता गेली होती. दुकानदाराने तिला दुकानामध्ये बोलावून तिचा विनयभंग केला. याबाब पीडितेने तिच्या आजीस सांगितले असता पीडितेची आजी दुकानात गेली व त्याला जाब विचारला. तेव्हा उलट तिलाच धमकावून ‘तुमच्या ने जे होते ते करा’ अशी धमकी दिली.
 
तक्रारीवरून चान्नी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास केला व न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयातील युक्तीवादानंतर गजानन शिवाजी गवई यास अल्पवयीन बालिकेचा विनयभंग केल्या प्रकरणी न्यायालयाने भा.द.वि. कलम ३७६ (२)(आय) मध्ये आजीवन कारावास व ५० हजार रुपे दंड, दंड न भरल्यास सहा महिने अतिरिक्त कारावास, ३७६(२)(जे) मध्ये आजीवन कारावास, व ५० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने अतिरिक्त कारावास, कलम ५०६ मध्ये दोन वर्ष कारावास व पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त कारावास व पोक्सो कायदा कलम तीन व चारमध्ये आजीवन कारावास व ५० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने अतिरिक्त कारावास आणि कलम सात व आठमध्ये पाच वर्षे कारावास व १० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास दोन महिने अतिरिक्त कारावास अशी शिक्षा ठोठावली.
 
वरील सर्व शिक्षा सोबत भोगावयाच्या आहेत. वरील प्रमाणे एकूण दंड एक लाख ६५ हजार रुपये आहे. सदर दंडाची रक्कम दोषीकडून वसुल झाल्यास त्यापैकी अर्धी रक्कम पीडितेस देण्यात यावी असा आदेश न्यायालयाने दिला आहे.