मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : मंगळवार, 10 ऑगस्ट 2021 (23:31 IST)

थकबाकी असलेल्या ग्राहकांना वीजबिल भरण्याचे आवाहन केले आहे

महावितरणची आर्थिक परिस्थिती खराब झाली असून मुख्य कार्यालयाने वीजबिल वसुलीसाठी सर्व परिमंडलांना निर्देश दिले आहेत. सक्तीची कारवाई म्हणून महावितरणने मुंबईच्या भांडूप परिमंडलातील एक लाख ११६ ग्राहकांचा वीजपुरवठा थकबाकीपोटी खंडित केला आहे. मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी थकबाकी असलेल्या ग्राहकांना वीजबिल भरण्याचे आवाहन केले आहे.
 
भांडूप परिमंडलातील उच्चदाब ग्राहकांची थकबाकी ४०.६१ कोटी आहे. लघुदाब ग्राहकांतील घरगुती, वाणिज्यिक आणि औद्योगिक ग्राहकांची थकबाकी २३५.७ कोटी, सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांची थकबाकी ५.७६ कोटी इतर ग्राहकांची ८.८५ कोटी, स्ट्रीटलाईटची थकबाकी १८५.०८ कोटी आहे. उच्चदाब व लघुदाब ग्राहकांची थकबाकी ४८०.६४ कोटी एवढी आहे. भांडूप परिमंडलाने विविध माध्यमातून ग्राहकांना वीजबिल भरण्याचे आवाहन वारंवार केले आहे. महावितरणची आर्थिक स्थिती गंभीर असून मुख्य कार्यालयाने वीजबिलाची थकबाकी वसूल करण्याचे निर्देश सर्व परिमंडलाना दिले. वीजखरेदी, वीज पारेषण, बँक कर्जाचे व्याज तसेच कर्मचाऱ्यांचा पगार, या सर्व बाबींसाठी महावितरणला पैसे मोजावे लागतात. जर ग्राहकांनी त्यांचे थकीत वीजबिल भरले नाहीत तर दैनंदिन खर्च भागविणे अत्यंत कठीण होणार आहे. म्हणून नाईलाजाने महावितरणला थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची वेळ आली आहे.
महावितरणच्या भांडूप परिमंडलातील थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची जोरदार मोहीम सुरु असून आत्तापर्यंत एक लाख ११६ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केला आहे. भांडूप परिमंडलातील ठाणे मंडळात १८.११ कोटी थकबाकी असलेल्या २८२२५ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केला आहे. पेण मंडळात १३३.७४ कोटी थकबाकीमुळे ३९८९० ग्राहकांचा तर वाशी मंडळात ४९.११ कोटी थकबाकीमुळे ३२००१ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केला आहे. महावितरण ग्राहकांच्या सोयीसाठी सध्या सुट्टीच्या दिवशीही सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्र सुरु ठेवेत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता, ग्राहक डिजीटल माध्यमाचा वापर करूनही घरबसल्या आपले वीजबिल www.mahadiscom.in किंवा महावितरणच्या मोबाईल Appद्वारे भरू शकतात.