गुरूवार, 14 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 15 जून 2021 (10:56 IST)

रामकुंडावर साकारणार ओझोनायझेशन प्लांट; काय आहे तो? त्याने काय होणार?

कोरोनारुग्णसंख्ये प्रमाण कमी होत असून ‘ब्रेक द चैन’ अंतर्गत लागू असलेले निर्बंध देखील मोठ्याप्रमाणावर शिथिल होत आहेत. त्यामुळे गोदावरी नदीवर होणाऱ्या प्रदुषणाबाबत कायमस्वरुपी उपयोजना करण्यासाठी गोदावरी प्रदूषण नियंत्रण समितीसह विभागनिहाय गठीत उपसमित्यांनी गोदावरी प्रदूषण नियंत्रण समितीच्या कामाला गती देवून गोदावरी प्रदूषण रोखण्यासाठी जनजागृती भर द्यावा, अशा सूचना विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिल्या आहेत.
 
विभागीय आयुक्त कार्यालयात दूरदृश्यप्रणालीद्वारे गोदावरी प्रदुषण नियंत्रण समितीच्या घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत विभागीय आयुक्त श्री. गमे बोलत होते. 
 
विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे म्हणाले की, गोदावरी नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी सर्व यंत्रणांनी गतीने काम करुन येणारा पावसाळा लक्षात घेता प्रलंबित असलेले सर्व कामे पूर्ण करावीत. तसेच रामकुंड पात्रातील प्रदूषण कमी करण्यासाठी सीएसआरच्या माध्यमातून रामकुंडावर ओझोनायझेशन प्लांट उभारण्याबाबतच्या सूचना गमे यांनी यावेळी बैठकीत दिल्या आहेत.
 
गोदापात्रासह ग्रामीण भागातील नद्यामध्ये वाढत असलेल्या पाणवेली काढण्यासाठी आवश्यक असलेली मशिनरी तांत्रिकबाबींची पूर्तता करुन काही काळासाठी जिल्हा परिषदेला देण्यात यावी. जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाच्या कामाची माहिती घेवून गोदावरीचे प्रदूषण रोखण्याबाबत ग्रामीण भागात जनजागृती करण्यात यावी. तसेच प्लास्टीक पुर्नवापराबाबत नियोजन करण्याच्या सूचना, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
 
विभागीय आयुक्त गमे म्हणाले, गोदापात्रात वाढणाऱ्या पानवेलींमुळे प्रदुषणाची समस्या निर्माण होत असल्याने स्मार्ट सिटी कार्यालयाने गोदावरी नदीच्या पात्रात वाढणाऱ्या पानवेली आधुनिक यंत्रसामुग्रीच्या माध्यमातून वेळोवेळी काढाव्यात. तसेच गोदावरी नदीपात्रात कपडे व गाडया धुण्याचे प्रमाण कमी झाले असल्याचे चित्र दिसत असल्याने विभागीय आयुक्त गमे यांनी यावेळी समाधान व्यक्त केले आहे.
 
या बैठकीत विभागीय आयुक्त  गमे यांनी मागील इतिवृत्ताचा व त्यावर केलेल्या कार्यवाहीचा विभागनिहाय उपसमित्यांचा आढावा घेतला. गोदावरी नदीत होणाऱ्या प्रदुषणावर नियंत्रण आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्याच्या सुचना यावेळी गमे यांनी बैठकीत दिल्या.
पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून अथवा साठवून त्याचा वापर करणे अन्य मार्गांनी पाण्याची बचत व संवर्धन करण्यासाठी ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ प्रणाली सर्व शासकीय व खाजगी कार्यालयात कार्यान्वित करण्यात यावी. या प्रणालीच्या यशस्वीतेसाठी महानगरपालिकेने विशेष लक्ष घालण्याच्या सूचना विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिल्या आहेत.